बडनेऱ्यात दिवसाआड पाणीपुरवठय़ाचे संकेत
By Admin | Updated: May 9, 2014 01:40 IST2014-05-09T00:54:51+5:302014-05-09T01:40:13+5:30
पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असताना जलकुंभाअभावी बडनेरा व मायानगर परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे.

बडनेऱ्यात दिवसाआड पाणीपुरवठय़ाचे संकेत
भीमटेकडी येथील जलकुंभावर ताण
अमरावती : पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असताना जलकुंभाअभावी बडनेरा व मायानगर परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याकडे हा प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविला आहे. १२ मे पासून दिवसाआड पाणीपुरवठा होईल, असे संकेत आहेत.
वाढती लोकसंख्या आणि नागरी वस्तीचा व्याप लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शासनाकडे नवीन चार जलकुंभ, विस्तारीत भागात जलवाहिन्या टाकणे, तपोवन येथे जलशुध्दीकरण केंद्र व सिंभोरा येथे पंप बसविणे असा ४४.४४ कोटी रूपयांचा प्रस्ताव नगरोत्थानअंतर्गत पाठविला होता. मात्र, ही योजना मंजूर करण्यासाठी लोकप्रतिनीधींचे प्रयत्न कमी पडले. परिणामी बडनेरा, मायानगर, नागपुरी गेट व मालटेकडी येथे नवीन जलकुंभ निर्माण करता आले नाहीत. अशातच बडनेरा जुनीवस्तीतील जलकुंभाचे आयुष्य संपल्याने अप्रिय घटना घडण्यापूर्वीच हे जलकुंभ जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे बडनेरा शहराला नवीवस्तीच्या जलकुंभावरून पाणीपुरवठा केला जात आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. परंतु पाणी मुबलक असतानादेखील जलकुंभाअभावी पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे. हीच स्थिती गोपालनगर व मायानगरातही आहे.
या भागात अनेक वर्षांपासून जलकुंभ निर्मितीचा प्रस्ताव आहे. मात्र, निधी उपलब्ध होत नसल्याने पाणी पुरवठय़ासंबंधीची कामे करता आली नाहीत. हे शल्य मजीप्राला आहे. बडनेरा व मायानगर येथील उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मजीप्राचा आहे. त्यामुळे मजीप्राने जिल्हाधिकार्यांना वस्तुनिष्ठ परिस्थितीचा अहवाल पत्राव्दारे कळविला आहे. बडनेरा व मायानगर वगळता उर्वरित शहराला नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा मानस मजीप्राचा आहे. (प्रतिनिधी)
बडनेरा येथे २0 लाख तर मायानगरात १0 लाख रूपये खचरून जलकुंभ बांधायचे आहेत. निधी नसल्याने हे काम लांबणीवर पडले आहे. जलकुंभाशिवाय ही समस्या सुटणार नाही. त्यामुळे तुर्तास दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
-अरविंद सोनार, कार्यकारी अभियंता,मजीप्रा
■ भीमटेकडी येथील जलकुंभावरून मायानगर, गोपालनगर, यशोदानगर, मोतीनगर, दस्तुरनगर, जुने बायपास लगतची लोकवस्ती आदी वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. या जलकुंभावरून क्षमतेपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत असल्याने ताण वाढला आहे. तपोवन येथील जलशुद्धीकरण कें द्रावरून पाणी खेचल्यानंतर जलकुंभाव्दारे टप्प्याटप्प्यात पाणीपुरवठा करण्याची कसरत मजीप्राला करावी लागत आहे.