पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 20:07 IST2019-07-05T20:07:28+5:302019-07-05T20:07:36+5:30
पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु अशा ५०२ प्रकल्पक्षेत्रांत चार ते पाच दिवसांतील पावसामुळे पाणीसाठ्यात दोन टक्क्यांची वाढ जलसंपदा विभागाने नोंदविली आहे.

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ
- संदीप मानकर
अमरावती : पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु अशा ५०२ प्रकल्पक्षेत्रांत चार ते पाच दिवसांतील पावसामुळे पाणीसाठ्यात दोन टक्क्यांची वाढ जलसंपदा विभागाने नोंदविली आहे. मात्र, हा पाऊस पुरेसा नाही. अद्यापही अनेक प्रकल्पांची कोरड कायम असून, जोरदार पावसाची प्रतीक्षा प्रकल्पक्षेत्रात आहे. २७ जून रोजी प्रकल्पांतील एकूण जलसाठा १०.८९ टक्के होता. तो आता १२.५२ टक्के झाला आहे.
विभागातील नऊ मध्यम प्रकल्पांमध्ये १३.११ टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये १६.८६ टक्के आणि ४६९ लघु प्रकल्पांमध्ये ९.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीसाठ्यात सरासरी दोन टक्क्यांची वाढ झाली असली तरी सर्वच जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला नसल्याने काही जिल्ह्यांत मध्यम प्रकल्पांची स्थिती बिकट आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा होत आहे. अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात २९.४१ टक्के, चंद्रभागा २७.९०, पूर्णा २४.६५, सपन ३८.७३, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस १९.४९, सायखेडा १८.६५, गोकी २०.५६, वाघाडी ११.६२, बोरगाव १०.८९, नवरगाव ४०.४६, अडाण ४.६१, अकोला जिल्ह्यातील मोर्णा १०.२३, वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी ७.३५, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा १५.५०, पलढग ३४.८९, मस ७.२५, मन २१.१२, तोरणा १८, तर उतावळी प्रकल्पात १८.५४ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, उमा, घुंगशी, वाशिम जिल्ह्यातील सोनल आणि कोराडी प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा आहे.
बॉक्स
मोठ्या प्रकल्पांची स्थिती
मौठ्या प्रकल्पांपैकी अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया अप्पर वर्धा धरणात १२.२६ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात २१.०१ टक्के, अरुणावती ९.५१, बेंबळा १८.८२, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ५.१२, वान २५.७१, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा ६.३८ टक्के, तर पेनटाकळी प्रकल्पात १२.८७ टक्के पाणीसाठा आहे. खडकपूर्णा प्रकल्पात पाणीसाठा शून्य टक्क््यांवर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे पेनटाकळी प्रकल्पात ३.८५ टक्क्याने पाणीसाठा वाढला आहे.