धामणगावातील ५० कर्मचाऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST2021-05-30T04:11:04+5:302021-05-30T04:11:04+5:30
देवगाव साखर कारखाना ताबा प्रकरण देवगाव सहकारी साखर कारखाना, धामणगाव रेल्वे : सन १९९६ पासून बंद असलेल्या देवगाव सहकारी ...

धामणगावातील ५० कर्मचाऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा
देवगाव साखर कारखाना ताबा प्रकरण
देवगाव सहकारी साखर कारखाना,
धामणगाव रेल्वे : सन १९९६ पासून बंद असलेल्या देवगाव सहकारी साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या १७ कोटी ७७ लाख ८९ हजारांच्या मोबदल्यात जिल्हा प्रशासनाने हा साखर कारखाना महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ताब्यात दिला. मात्र, कर्मचाऱ्यांबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आली नसल्याने या कारखान्या संबंधित ५० कर्मचाऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा पत्रकार परिषदेत दिला.
देवगाव साखर कारखाना १९९६ मध्ये बंद पडून २ मे २००५ मध्ये अवसायनात काढण्यात आला होता.
या कारखान्यासाठी ५० हून अधिक शेतकऱ्यांनी आपली जागा हा कारखाना उभारण्यासाठी दिली होती. संबंधित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या लागल्या. मात्र, कारखाना बंद पडल्याने त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. आजही त्यांच्या १९९६ च्या फरकाप्रमाणे भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न कायम आहे. सदर कारखाना १७ कोटी ७७ लाख ८९ हजार रुपये थकीत असल्याने महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने या कारखान्याचा ताबा घेतला. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या भविष्याबाबत कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. आगामी काळात संबंधित कारखान्याची जागा राज्य सहकारी बँक इतर कंपन्यांना तथा व्यक्तींना विक्री करेल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपली स्वतःची जमीन दिली, त्यांच्यासाठी राज्य शासनाने कोणताही विचार केला नाही.
- तर पर्याय नाही
या भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळेल. हा भाग सुजलाम् सुफलाम् होईल, असे आमचे स्वप्न होते. त्यामुळे आम्ही जागा दिली. मात्र, २० वर्षांपासून संघर्ष कायम आहे. आमची दुसरी पिढी या संघर्षात गारद होत आहे. जिल्हा प्रशासनाने आमच्या हक्काची जागा राज्य सहकारी बँकेला दिली. मात्र, आमचा कोणताही विचार का केला नाही. आम्हाला सामूहिक आत्मदहनाशिवाय पर्याय नाही, अशी माहिती पत्रपरिषदेत शेतकरी समितीचे राजू मेटे, वैभव सोळंके, हर्षल तोढरे, किरण सौंदरकर, हर्षवर्धन मोहाडे, अनंता नेहारे, चंदू ठाकरे, रवि ससनकर, बबनराव कुयटे, भूषण रोकडे, शेख रशीद शेख मेहबूबा, मनोज वेरूळकर यांनी दिली.