प्रभाग रचना, आरक्षणावर २६ आक्षेप
By Admin | Updated: July 17, 2016 00:05 IST2016-07-17T00:05:37+5:302016-07-17T00:05:37+5:30
जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या प्रभाग रचना व आरक्षण यावर १४ जुलैपर्यंत आक्षेप व हरकती जिल्हा प्रशासनाने मागविल्या होत्या.

प्रभाग रचना, आरक्षणावर २६ आक्षेप
नऊ पालिका : जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष १९ जुलैपासून सुनावणी
अमरावती : जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या प्रभाग रचना व आरक्षण यावर १४ जुलैपर्यंत आक्षेप व हरकती जिल्हा प्रशासनाने मागविल्या होत्या. अंतिम मुदतीपर्यंत ७ नगरपरिषदेत २६ आक्षेप दाखल झालेत तर २ नगरपरिषद निरंक आहेत. यावर १८ ते २२ जुलैदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी होऊन प्रारूप रचनेला अंतिम स्वरुप देण्यासाठी आराखडे विभागीय आयुक्तांकडे जाणार आहे.
जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरूड, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, धामणगाव, दर्यापूर, वरूड, शेंदूरजनाघाट या नगरपंचायतींचा कालावधी १६ डिसेंबर २०१६ या कालावधीत संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी सार्वत्रिक निवडणूका होत आहे. त्याअनुषंगाने आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाद्वारे विविध प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. या नऊही नगरपरिषदांमध्ये २०११ मधील जनगणनेच्या आधारावर प्रभाग रचना करण्यात आली व २ जुलै रोजी प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले, प्रभाग रचना व सदस्यपदांचे आरक्षण यावर ४ ते १४ जुलै या कालावधीत आक्षेप मागविण्यात आले होते. या १० दिवसात २६ आक्षेप नगर विकास कार्यालयास प्राप्त झाले आहे. यामध्ये अचलपूर नगरपरिषदेसाठी ३ आक्षेप, अंजनगाव सुर्जी ८, चांदूरबाजार २, चांदूररेल्वे ३, मोर्शी ३, शेंदूरजनाघाट ४, दर्यापूर ३ व धामणगाव नगरपरिषदसाठी ३ आक्षेप दाखल झाले आहेत. वरूड व शेंदूरजनाघाट येथे आक्षेप निरंक आहेत. या सर्व ठिकाणी १८ ते २२ जुलै दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी होणार आहे. यासाठी पुराव्यासह उपस्थित रहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
आक्षेपांवर मंगळवारपासून सुनावणी
जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागात नऊ नगरपरिषदांसाठी रीतसर आक्षेप नोंदविण्यात आले. याची सुनावणीसाठी नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत. सुनावणी ही अचलपूरसाठी २२ जुलै, अंजनगाव सुर्जी २० जुलै, चांदूरबाजार १८ जुलै, चांदूररेल्वे २१ जुलै, मोर्शी १९ जुलै, दर्यापूर १९ जुलै व धामणगाव रेल्वे २१ जुलै रोजी राहणार आहे.
गुगल मॅपद्वारे प्रभाग रचना
जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेसाठी यावेळी प्रथमच गुगल मॅपचा वापर करण्यात आला. त्यामुळे प्रभागातील गट आणि त्यानुसार केलेली रचना यामुळे आक्षेपांची संख्या कमी झाली. केवळ ७ नगरपरिषदांमध्ये २६ आक्षेप दाखल झाले तर २ नगरपरिषदांमध्ये आक्षेप निरंक आहेत.