सात महिन्यांची प्रतीक्षा, १७ दिवस गट्टी, पुन्हा सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST2021-02-14T04:13:16+5:302021-02-14T04:13:16+5:30

दहावी, बारावी सोडून सर्व शाळांचे वर्ग बंद, प्रशासनाचे आदेश शाळांत धडकले, विद्यार्थ्यांना ऐनवेळी परतविले अमरावती : सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ...

Waiting for seven months, 17 days off, vacation again | सात महिन्यांची प्रतीक्षा, १७ दिवस गट्टी, पुन्हा सुट्टी

सात महिन्यांची प्रतीक्षा, १७ दिवस गट्टी, पुन्हा सुट्टी

दहावी, बारावी सोडून सर्व शाळांचे वर्ग बंद, प्रशासनाचे आदेश शाळांत धडकले, विद्यार्थ्यांना ऐनवेळी परतविले

अमरावती : सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर २३ जानेवारीपासून पाचवीपासून पुढील शाळा सुरू झाल्या. प्राथमिक शाळेतून माध्यमिक वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांची नावे वहीत लिहून घेतली. पुढील वर्गातील जुने सवंगडी पुन्हा एकत्र आले. जेमतेम १७ दिवस होत नाही तोच शनिवारी त्यांना शाळेच्या फाटकातून परतविले गेले अन् मित्र दूर जाणार, या जाणिवेतून मन खट्टू झाले.

शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दीड शतकी मजल गाठल्यानंतर २००-३०० च्या घरात कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयावर महापौरांनी शुक्रवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब केला. मात्र, तो निर्णय पालकांपर्यंत न गेल्याने त्यांच्या मागे लागून अनेक मुले शाळेत दाखल झाली. पण, प्रशासनाचा निर्णय कळविण्यासाठी फाटकापुढे तैनात करण्यात आलेल्या शिक्षकांनी त्यांना परतविले. काही दिवसांच्या शाळेत दोस्ती जमलेल्या मुलांना आपल्या चिमुकल्या सोबत्याला भेटायचे होते. त्याच्याशी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवूनच का होईना, बोलायचे होते. शिक्षकांना अभ्यास दाखवायचा होता. ते सर्व पुन्हा दप्तरबंद झाले आहे.

घरी परतणा-या विद्यार्थ्यांची गर्दी शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास वडाळीच्या मनपा शाळा क्रमांक १४ येथे दृष्टीस पडली. शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद असल्याचे सांगण्याची जबाबदारी येथे वर्गशिक्षक असलेल्या दिव्यांग शिक्षिका ज्योत्स्ना खडसे यांनी पार पाडली. याशिवाय सूचना फलकही लावले होते. वडाळी येथील शाळेत ३५ मुले आली होती.

बॉक्स

शहरात ४२ शाळा, ६ हजार विद्यार्थी

अमरावती महापालिकेंतर्गत शहरात ५० शाळा असून, ९५०० विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये इयत्ता ५ वी ते ८ वीच्या ४२ शाळा असून, ६ हजारांवर विद्यार्थीसंख्या आहे.

--------------

कोट

मुले नियमित शाळेत यायला सुरुवात झाली होती. मुलांना शिकवणीची लिंक लागली असतानाच पुन्हा वाढत्या कोरोनामुळे शाळा बंदचा निर्णय धडकल्याने आता ऑनलाईन अभ्यासाक़डे वळावे लागेल.

- योगेश पखाले, मुख्याध्यापक

--

शिक्षकांचा मेसेज शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाल्याने मुलाला शाळेत पाठविले नाही. पण, शाळा बंदच्या निर्णयाने दु:ख झाले. माझा मुलगा सातवीत शिकतो. आम्ही रोज कामात व्यस्त राहत असल्याने त्याचा अभ्यास घेऊ शकत नाही.

- प्रतिभा मोहोड,

पालक, वडाळी.

Web Title: Waiting for seven months, 17 days off, vacation again