ग्रामीण भागात लालपरीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST2020-12-11T04:38:51+5:302020-12-11T04:38:51+5:30
पुसला : अनलॉक ४ मध्ये एसटी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु ग्रामीण भागातील एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल ...

ग्रामीण भागात लालपरीची प्रतीक्षा
पुसला : अनलॉक ४ मध्ये एसटी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु ग्रामीण भागातील एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. खासगी प्रवासी वाहतुकीला मात्र सुगीचे दिवस आले आहे.
अनलॉक झाल्यापासून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, वरूड तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी बसेस सुरू करण्यात आल्या नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. नुकतेच शैक्षणिक वर्ग सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी वरूड येथे शिक्षण घेतात. शिक्षण घेण्याकरिता, ग्रामीण भागातून शहरात ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी बसेस नसल्यामुळे अव्वाच्या सव्वा पैसे मोजून खासगी वाहतुकीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात मजूर वर्गाकडे स्वत:चे वाहन नसल्याने खाजगी प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. खासगी वाहतूक चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेत असून तिकीट दरदेखील वाढविण्यात आले आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकांचा मनमानी कारभार सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिक एसटी बसेसच्या प्रतीक्षेत असून, बसेस सुरू करण्याची मागणी होत आहे.