नांदुरा येथे संत चापालाल महाराजांची यात्रा
By Admin | Updated: March 1, 2015 00:21 IST2015-03-01T00:21:47+5:302015-03-01T00:21:47+5:30
मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गडाच्या पायथ्याशी वसलेल्या नांदुरा येथे २३ व २४ फेब्रुवारी रोजी संत चापालाल महाराजांची यात्रा भरली होती.

नांदुरा येथे संत चापालाल महाराजांची यात्रा
अमरावती : मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गडाच्या पायथ्याशी वसलेल्या नांदुरा येथे २३ व २४ फेब्रुवारी रोजी संत चापालाल महाराजांची यात्रा भरली होती. यामध्ये अमरावती व वर्धा जिल्ह्यातील ३६ तांड्यांचे बंजारा भाविक सहभागी झाले. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
विदर्भात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांची उत्पत्ती राजस्थानातील असल्याचे जाणकारांचे मत आहे. शेकडो वर्षांपूर्वी वऱ्हाड प्रांतात येताना 'लदणी' लादत डफडी वाजवीत त्यांचे आगमन झाले. त्यानंतर तांडे करून हा समाज विविध ठिकाणी वास्तव्य करू लागला. गोपालन त्यांचा मुख्य व्यवसाय. गरांना ज्या भागात चाऱ्याची सोय होऊ शकेल अशा ठिकाणी जावे लागत असल्याने या समाजाला भटक्या जमातीत स्थान मिळाले. त्यांचे श्रद्धास्थान संत सेवालाल महाराज व संत चापालाल महाराज होय. हे दोन्ही संत एकाच शतकात विदर्भात वास्तव्याला आले होते. त्यांचा व्यवसाय गोपालन व रसद पुरविणे हा होता. तेव्हा संत चापालाल महाराज गाई चारत असत. कालांतराने त्यांची संत सेवालाल महाराजांशी भेट झाली. विशेष म्हणजे हे दोन्ही संत सन्याशी होते. त्यांनी केवळ समाजाच्या सेवार्थ कार्य केले. त्यामुळे समाजाचे ते दैवत बनले. त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित राहण्यासाठी संत सेवालाल व संत चापालाल महाराजांनी सीमा आखून दिली होती. ती अशी की, बेंबळा नदीच्या पलीकडील भागातील बंजारा समाज हा संत सेवालाल तीर्थस्थळी पोहरा देवी (ता. दिग्रस, जि. यवतमाळ) येथील नियोजित कार्यक्रमात सहभागी होतील, तर बेंबळा नदीच्या अलीकडील भागात वास्तव्याला असलेला बंजारा समाज संत चापालाल महाराजांच्या पुन्यतिथी-जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होणार, असे ठरविण्यात आले होते. त्यानुसार रामनवमीच्या दिवशी संत सेवालाल महाराजांची जयंती पोहरा देवी येथे साजरी केली जाते.
बंजारा संस्कृतीतील विविध कार्यक्रम पार पडतात. त्याचप्रमाणे मोर्शी तालुक्यतील पिंगळादेवी गडाच्या पायथ्याशी वसलेले नांदुरा येथे संत चापालाल महाराजांची पुण्यतिथी महाशिवरात्रीनंतर पाचव्या दिवशी आयोजित करण्यात येते. येथे पहिल्या दिवशी भजनी दिंड्यांचे आगमन, भजन कार्यक्रम होते. महाप्रसादाचा कार्यक्रम तर दुसऱ्या दिवशी बोकड पूजेचा कार्यक्रम नियमित होतो. येथे बोकडांचा बळी देऊन देवाचे नवस फेडण्याची परंपरा आजही कायम आहे. या दोन दिवसांत येथे हजारो नागरिकांची उपस्थिती राहत असून मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजात एकोप्याची भावना कायम राहावी. या उद्देशाने तिवसा मतदार संघाच्या आ. यशोमती ठाकूर यांनी या ठिकाणी भाविकांना सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून मोठे समाजभवन उभारले आहे. पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच मोर्शीचे आ. अनिल बोंडे यांनीकेधील विकास कार्य केले आहेत. तसेच कार्यक्रमाचे नियोजन ठेवण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. चिरोडीचे रमेश राठोड ट्रस्टचे अध्यक्ष, तर उपाध्यक्ष म्हणून शेंदोळा येथील जग्गू महाराज आहेत. येथे मोठ्या प्रमाणात भाविक येत असताना कुठलीही अनुचित घटना घडली नाही. भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.