विनोद शिवकुमार जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:40+5:302021-06-20T04:10:40+5:30

पुन्हा पळून जाणार, मुख्य आरोपी वकिलांचा युक्तिवाद परतवाडा : हरिसाल वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या गुगामल ...

Vinod Shivkumar's bail application rejected by court | विनोद शिवकुमार जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

विनोद शिवकुमार जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Next

पुन्हा पळून जाणार, मुख्य आरोपी वकिलांचा युक्तिवाद

परतवाडा : हरिसाल वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जामिनावर शनिवारी दुपारी दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून अचलपूर येथील पहिले तदर्थ व सत्र न्यायाधीश एस. के. मुंगीनवार यांच्या न्यायालयाने विनोद शिवकुमार यांचा जामीन फेटाळला. त्यामुळे आता पुन्हा नागपूरला न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे. दुसऱ्यांदा एकाच न्यायालयाने जामिनाचा अर्ज फेटाळला, हे विशेष.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी चार्जशीट (आरोपपत्र) दाखल केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार आरोपी तथा निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या वकिलांच्यावतीने अचलपूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी अभियोक्ता डी. ए. नवले व गोविंद विचोरे, तर आरोपीच्यावतीने वकील दीपक वाधवानी यांनी बाजू मांडली. प्रकरणातील फिर्यादी तथा दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांच्याकडून सरकारी पक्षाला मदत करीत पुसद येथील वकील विवेक टेहरे व दीपक खुशलानी यांनी लेखी युक्तिवाद न्यायालयात सादर केला.

बॉक्स

रेड्डीला दिली, आम्हाला पण द्या

आरोपींच्या वकिलांनी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा निलंबित प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना उच्च न्यायालयातून जामीन देण्यात आला. त्याचप्रमाणे सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा. न्यायालयात चार्जशीट दाखल झाली असून, पोलिसांचा तपास संपला आहे. आरोपी सरकारी अधिकारी असल्याने पळून जाऊ शकत नाही. आपण दिलेल्या आदेशाचे पूर्ण पालन व वेळोवेळी सहकार्य करेल. या व इतर बाबी मांडत, विनोद शिवकुमारला जमीन देण्याची बाजू मांडली.

बॉक्स

विनोद शिवकुमार पळून जाणार

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात विनोद शिवकुमार मुख्य आरोपी आहे. यापूर्वी तो पळून गेला होता. नागपूर येथून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या त्रासामुळे दीपालीचा गर्भपात झाला, असा आरोपसुद्धा आहे, तर श्रीनिवास रेड्डीविरुद्ध गुन्हा व आरोप वेगळे आहे. त्यामुळे या प्रकरणाशी समानतेचे तत्त्व जामिनासाठी लागणार नाहीत, असा युक्तिवाद सरकारी अभियोक्ता डी. ए. नवले यांनी केला. प्रकरणातील उपलब्ध पुराव्यात न्यायालयाने केलेल्या आदेशात कुठलाही बदल भक्कम पुरावे असल्यामुळे सद्यस्थितीत होऊ शकत नाही. विनोद शिवकुमार पुन्हा पळून जाऊ शकतो आदी बाबी प्रखरतेने मांडल्या. दीपालीचे पती तथा फिर्यादी राजेश मोहिते यांच्यातर्फे वकिलांनी लेखी युक्तिवादात दीपालीचा छळ कशाप्रकारे झाला, या मुद्यला धरून जामिनाला विरोध करणारी बाजू मांडली.

बॉक्स

शिवकुमारचा प्रवास, अचलपूर ते नागपूर

मुख्य आरोपी विनोद शिवकुमार याच्या जामिनाचा प्रवाससुद्धा अचलपूर ते नागपूर न्यायालयात फिरत आहे. दीपालीच्या आत्महत्येनंतर नागपूर रेल्वे स्थानकावरून विनोद शिवकुमारला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. वकिलांनी अचलपूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने तो फेटाळला. त्यामुळे नागपूर न्यायालयात अर्ज दाखल केला. दरम्यान अचलपूर न्यायालयात प्रकरणाची चार्जशीट पोलिसांनी दाखल केली. पुन्हा नागपूर न्यायालयाने अचलपूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे आदेश दिले. शनिवारी अचलपूर न्यायालयाने जामिनावरील अर्ज फेटाळला आता पुन्हा नागपूर न्यायालयात विनोद शिवकुमारच्या वकिलाला जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे.

कोट

सहा.सरकारी अभियोक्ता

अचलपूर

Web Title: Vinod Shivkumar's bail application rejected by court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.