विजय देशमुख यांना ‘जल बचत शेतकरी’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मेक्सिकोमध्ये होणार पुरस्कार वितरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 17:15 IST2017-09-18T17:14:43+5:302017-09-18T17:15:10+5:30
डॉ. शरद देशमुख पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष विजय देशमुख यांची आंतरराष्ट्रीय सिंचन आयोग दिल्लीद्वारे ‘जलबचत शेतकरी’पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

विजय देशमुख यांना ‘जल बचत शेतकरी’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मेक्सिकोमध्ये होणार पुरस्कार वितरण
वरूड (अमरावती), दि. 18 : डॉ. शरद देशमुख पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष विजय देशमुख यांची आंतरराष्ट्रीय सिंचन आयोग दिल्लीद्वारे ‘जलबचत शेतकरी’पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार त्यांना १० आॅक्टोबर रोजी मेक्सिको येथे आयोजित सोहळ्यात दिला जाईल.
स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख दोन हजार अमेरिकन डॉलर (१ लाख ४० हजार रुपये) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वरूड येथील डॉ.शरद देशमुख पाणीवापर संस्था ही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील पहिलीच संस्था आहे, हे येथे उल्लेखनीय.
ड्रायझोनमधील वरूड तालुक्यातील डॉ. शरद देशमुख पाणीवापर संस्थेला यापूर्वी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन २००६ साली स्थापन करण्यात आलेल्या या पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील १०७ शेतकरी १६१ हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळत आहेत. मागील अनेक वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील नागठाणा प्रकल्पातून पाण्याचा ऊपसा करून सिंचनाचे नियोजन शेतकरी करीत आहेत.
पाण्याचा उपसा करण्यासाठी ‘सायफन’ पद्धतीचा वापर केला जात असल्याने वेळेसह पाण्याचीदेखील बचत होत आहे.
शून्य ऊर्जेवर चालणारा हा विदर्भातील एकमेव प्रकल्प आहे. तालुक्यातील रवाळा, तिवसाघाट, शेंदूरजनाघाट, पिंपळशेंडा, वाई, आंतरखोप, वरुड भाग १ आणि भाग २ या शिवारापर्यंत शून्य ऊर्जेवर पाणी पोहोचविण्यात संस्थेला यश आले आहे. विशेष म्हणजे शुद्धीकरणाची सोय असल्याने कचराविरहित पाणी सिंचनासाठी वापरले जाते. लवकरच ‘पाईप टर्बाईन’लावून वीजनिर्मिती करण्याचा मानस पाणीवापर संस्थेने केला आहे.