Vidyavihar colony | विद्याविहार कॉलनीत देहविक्रय अड्ड्यावर धाड
विद्याविहार कॉलनीत देहविक्रय अड्ड्यावर धाड

ठळक मुद्देपोलिसांकडे यापूर्वी केली होती तक्रार : चार महिलांसह सहा जण ताब्यात; एक अल्पवयीन, अनेक वर्षांपासून सुरू होता प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील विद्याविहार कॉलनीत एका घरात थाटलेल्या देहविक्री अड्ड्यावर राजापेठ पोलिसांनी गुरुवारी धाड टाकून चार महिलांसह सहा जणांना ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी २ वाजता दरम्यान करण्यात आली. अनेक वर्षांपासून गोरखधंदा येथे सुरू आहे. नागरिकांनी ठाण्यात धाव घेऊन माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पुरुषांमध्ये मनोज महादेवराव सोनोने (४०, रा. सावरखेडा ता. मोर्शी) सह १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा, परतवाडा येथील ३५ वर्षीय, बेलपुरा येथील ३० वर्षीय आणि प्रवीणनगरातील ३२ वर्षीय महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्या घरात हा व्यवसाय सुरू होता, ती महिला या गैरकृत्याची मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध कलम १५१ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, देहविक्रीच्या या अड्ड्याला परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षांपासून विरोध सुरू होता. पोलिसांकडे याबाबत अनेकदा तक्रारीसुद्धा नागरिकांनी केल्या होत्या. गुरुवारी नागरिकांच्या संयमाचा बाण सुटला व नागरिकांनीच एकत्र येवून सदर देहविक्री करणाऱ्या महिलांना व त्या ठिकाणी आलेल्या ग्राहकांना पोलिसांच्या मदतीने पकडून देऊन या व्यवसायाचा पर्दाफाश केला. सदर महिला व मुले अनैतिक कृत्य करण्याच्या उद्देशाने येथील महिलेच्या घरात गेले होते, अशी लेखी तक्रारही नागरिकांनी राजापेठ पोलिसांकडे केली आहे. बाहेरील महिलांना व मुलींना आणून त्यांच्याकडून घरात देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जातो. सदर महिलेवर कठोर कारवाई करण्यात यावी व देहविक्रीच्या या प्रकाराला परिसरात कायमचा पायबंद घातला जावा, अशी मागणी पोलीस ठाण्यात धडकलेल्या नागरिकांनी केली. या घटनेची परिसरात चर्चा सुरू असून, पोलीस या प्रकारावर कितपत अंकुश ठेवणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकारावर कायमस्वरुपी पायबंद घालण्यात यावे, याकरिता परिसरातील रहिवाशांनी पोलिसांना अनेकदा निवेदन दिल्याचे सांगण्यात आले.

अनोळखी ग्राहकांचा वावर
सदर महिलेच्या घरात दिवसा तसेच रात्रीदेखील अनोळखी व्यक्तींचा वावर राहात होता. डोळ्यादेखत सुरू असलेल्या या प्रकाराला नागरिकसुद्धा त्रासले होेते. परिसरात नागरिकांना गर्भनिरोधक साधने इतस्त: पसरलेली दिसायची. आपल्या लहानग्यांवर त्याचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून नागरिकच हे साहित्य पेटवून देत होते.

यापूर्वी दोनदा धाडी
यापूर्वी दोनदा पोलिसांनी सदर घरावर धाडी टाकल्या तरी हा अड्डा सुरूच राहिला. त्यामुळे नागरिकांनी शहर पोलीस आयुक्तांकडेही तक्रार दिली होती. याच घरापुढे लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज जप्त करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नागरिकांची धडक
सदर प्रकार असह्य झाल्याने गुरुवारी दुपारी नागरिकांनी राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. रोशन देशमुख, संजय रायकर, राजेश जगताप, भूषण कहाळे आदींनी तक्रार नोंदविली. कठोर कारवाई न केल्यास वरिष्ठांकडे तक्रार नेऊ, असे या नागरिकांचे म्हणणे होते.

विद्याविहार कॉलनीतील एका महिलेच्या घरात गैरप्रकार सुरू असल्याची नागरिकांकडून माहिती प्राप्त झाली. धाड टाकून घरमालकिणीसह इतर तीन महिलांना व एका पुरुषाला ताब्यात घेऊन प्रतिबंधक कारवाई केली आहे.
- किशोर सूर्यवंशी,
ठाणेदार,
राजापेठ पोलीस स्टेशन

विद्याविहार कॉलनीत महिलेच्या घरात गेल्या अनेक महिन्यांपासून गैरकृत्य सुरू होते. नागरिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. त्यांनी धाड टाकून सदर महिलांना ताब्यात घेतले. मात्र, हा प्रकार पूर्णपणे बंद व्हावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
- प्रशांत जाधव,
सामाजिक कार्यकर्ता

Web Title: Vidyavihar colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.