विदर्भ विकास मंडळाची निधीला ‘ना’!
By Admin | Updated: August 2, 2016 23:54 IST2016-08-02T23:54:28+5:302016-08-02T23:54:28+5:30
सन २०१५-२०१६ या वित्तीय वर्षापासून विदर्भ विकास मंडळाला राज्य शासनाकडून विशेष निधी प्राप्त झालेला नाही.

विदर्भ विकास मंडळाची निधीला ‘ना’!
२८ कोटींबाबत असमर्थता : महापालिका आयुक्तांना पत्र
अमरावती : सन २०१५-२०१६ या वित्तीय वर्षापासून विदर्भ विकास मंडळाला राज्य शासनाकडून विशेष निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आपण प्रस्तावित केलेल्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही, अशा शब्दांत विदर्भ विकास मंडळाने निधीबाबत नकार कळविला आहे.
अमरावती महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी शहरातील १० प्रकल्पांसाठी २८०९ लाख रूपयांच्या निधीची मागणी विदर्भ विकास मंडळाकडे केली होती. ५ जुलैला आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव विदर्भ विकास मंडळाच्या सदस्य सचिवांच्या नावे पाठविला होता.
यात महिला स्वच्छतागृहांसाठी २९७ लाख रुपये, स्मशानभूमी सुधारणेसाठी २९८ लाख रुपये, पब्लिक वर्क्स इम्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीमसाठी १५० लाख रुपये, ई-वेस्टसाठी २९९ लाख रुपये, महिला उद्योजकता केंद्रासाठी ३०० लाख रुपये, प्लास्टिक वेस्ट विल्हेवाट प्रकल्पासाठी २९७ लाख रुपये, हॉटेल वेस्ट विल्हेवाट प्रकल्पासाठी २९८ लाख रुपये, शहरातील पाणीपुरवठ्यासाठी ३०० लाख रुपये, छोट्या जनावरांसाठी कत्तलखाना उभारण्याकरिता ३०० लाख रुपये आणि अत्याधुुनिक मटण मार्केटसाठी २७० लाख रुपये अशा एकूण २८०९ लाख रूपयांची मागणी करणारा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी ५ जुलैला पाठविला.
महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता, या प्रस्तावाकरिता विदर्भ विकास मंडळाने अनुदान स्वरूपात निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती मंडळाच्या सदस्य सचिवांकडे करण्यात आली.
तथापि, अमरावती महापालिकेने प्रस्तावित केलेल्या या सर्व प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही, अशा शब्दांत विदर्भ विकास मंडळाच्या अपर आयुक्त तथा सदस्य सचिव निरुपमा डांगे यांनी महापालिका आयुक्त हेमंत पवार यांना कळविले आहे. विदर्भ विकास मंडळाने अशाप्रकारे निधी उपलब्ध करून देण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे हे प्रकल्प तुर्तास प्रलंबित राहतील. (प्रतिनिधी)
यापूर्वीही पाठपुरावा
मनपा क्षेत्रातील दहा प्रकल्पांसाठी २८ कोटी रूपयांच्या निधीसाठी यापूर्वीही जोरकस प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यांना यश मिळू शकले नाही. आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पवारांनीही विदर्भ विकास मंडळाकडे पाठपुरावा केला.