पशुवैद्यकीय दवाखाना वराहांचे आश्रयस्थान !
By Admin | Updated: December 23, 2014 22:57 IST2014-12-23T22:57:11+5:302014-12-23T22:57:11+5:30
येथील जि. प. पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था दयनीय झाली आहे. या पशू वैद्यकीय दवाखान्याला नाव असलेले प्रवेशद्वार नसून आजूबाजूला सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने

पशुवैद्यकीय दवाखाना वराहांचे आश्रयस्थान !
चांदूरबाजार : येथील जि. प. पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था दयनीय झाली आहे. या पशू वैद्यकीय दवाखान्याला नाव असलेले प्रवेशद्वार नसून आजूबाजूला सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने येथे वराहांचा मुक्त वावर असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हा पशू वैद्यकीय दवाखाना न. प. विद्यालय, मोर्शी रोडवर गावाच्या मध्यभागी असून त्याला चारही बाजूने कुंपन सुद्धा नाही. येथे डॉ. अभय खेरडे हे पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे प्रमोशन महिन्याभरावर येऊन ठेपले असल्याने त्यांच्याकडून नागरिकांना विविध योजनांची कुठलीही माहिती मिळत नसून त्यांचा वेळ अमरावतीवरून येथे येण्या-जाण्यातच अधिक जातो.
मार्च १९५५ मध्ये राष्ट्रीय विस्तार सेवा योजनेद्वारे येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करण्यात आले. त्यामध्ये आॅफीस रूम, स्टोअर रूम, डिसपेडींग रूमचा समावेश होता. मात्र सदर इमारतीला ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे दोन वर्षापूर्वीच नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. परंतु सदर इमारतीला खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली नसून न. प. कार्यालयामागेही वॉलकम्पाऊंड नसून आजूबाजूने गवत वाढलेले आहे. डॉक्टरांकरिता राहण्याची अवस्था करण्यात आली असतानाही येथे रात्रीला मुक्कामी डॉक्टर राहत नसल्याने गुराढोरांचे काहीच खरे नाही.
डॉक्टरच्या निवासस्थानाचीही दुर्दशा झाली असून त्याचकडे जि. प. चे लक्ष नाही. येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा दर्जा श्रेणी एकचा असल्यानंतरही कुठेही ती श्रेणी आढळून येत नाही. गुराढोरांना लोखंडी पाईपने केलेल्या कठड्यामध्ये उघड्यावरच ऊन, वारा, पाऊस व थंडीच्या दिवसात तपासण्यात येते व थातूरमातूर उपचार केल्यानंतर मालकाच्या हवाली करण्यात येते. येथे पशुधन पर्यवेक्षक म्हणून दोन डॉक्टर कार्यरत आहेत. एक अटेन्डंस आहे. परंतु एक ड्रेसरची जागा अजूनही रिक्तच असल्याने ड्रेसरचे काम उपस्थित कर्मचाऱ्यांनाच करावे लागते. चांदूरबाजार हे तालुक्याचे ठिकाण असल्याने व तालुक्यात गुराढोरांची संख्या अधिक असल्याने श्रेणी १ असलेल्या या पशुवैद्यकीय दवाखान्याला दर्जेदार बनविणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)