वाह पान! अंबानगरीत रोज दीड लाख खवय्यांचं रंगतं पान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 17:55 IST2021-12-23T17:42:05+5:302021-12-23T17:55:23+5:30
पान म्हणजे अनेकांच्या जीव्हाळ्याचा विषय. लग्न समारंभ असो की उत्सव चटकमटक जेवणानंतर पानाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पानाचे विविध प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर, पान खाण्याऱ्यांचीही संख्या बरीच मोठी आहे.

वाह पान! अंबानगरीत रोज दीड लाख खवय्यांचं रंगतं पान!
अमरावती : पानाचं आणि अमरावतीकरांचं नातं तसं जुनंच आहे. अगदी या खाण्याच्या पानामध्येही आर्थिक गणित दडलंय. पानाच्या एका विड्यात दोन पाने असतात. त्यानुसार शहरासह जिल्ह्यात दररोज दीड लाख खवय्यांचं पानं रंगतं. एका करंडीत जवळपास तीन हजार पाने असतात. त्यानुसार आठवड्याला दीड ते दोन हजार करंड्या विकल्या जात असल्याची माहिती आहे.
करंडीतील तीन हजार पानांचा दर त्यांचा लहान-मोठा आकार पाहून ठरत असतो. मोठ्या पानाची करंडी जादा दराने विकली जाते. आठवड्याला ४०० ते ५०० करंड्या विकल्या जातात. प्रत्येक करंडीत सुमारे तीन हजार पानं असतात. किरकोळ विक्री करताना शेकड्याने पाने विकली जातात.
अमरावतीचं मार्केट
अमरावतीत आठड्यातून तीन ते चार दिवस बाजार समितीत पानांचा लिलाव होतो. साधारणत: पान टपरीवर विकली जाणारे पान नागपूरहून येतात, शिवाय आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथूनही अमरावतीत पानं येतात.
बनारस, कलकत्ता, कपूरी पानाचे लाखावर खवय्ये
जिल्ह्यात कलकत्ता, बनारस, कपूरी या पानांचे लाखावर खवय्ये आहेत. त्यामुळे पानाची क्रेझ आजही कायम आहे. शहर आणि ग्रामीण भागात पानविक्रीच्या व्यवसायाचं गणित पकडलं तर रोज दोनशे पानांच्या करंड्या विकल्या जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गुटख्यामुळे या व्यवसायावर संकट ओढावले आहे.
चार ते पाच मुख्य विक्रेते
अमरावतीत पानविक्री करणारे चार ते पाच मुख्य विक्रेते आहेत. आंध्र प्रदेशातून येणारे पान रेल्वे किंवा महामार्गाने येतात. पानांची तशी फारशी चर्चा होत नसली तरी हा लाखोंचा व्यवसाय असून शहरातील काही विशिष्ट भागात पानांना चांगली माणगी असते.