लसीकरण वाहने आरोग्य यंत्रणेकडून तालुक्याला हस्तांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:17 IST2021-08-27T04:17:26+5:302021-08-27T04:17:26+5:30
जिल्हा परिषद; अध्यक्ष, सभापतींनी दाखविली हिरवी झेंडी अमरावती : लसीकरणाच्या कामाला अधिक वेग यावा म्हणून महापारेषण कंपनीने जिल्ह्याला १८ ...

लसीकरण वाहने आरोग्य यंत्रणेकडून तालुक्याला हस्तांतरित
जिल्हा परिषद; अध्यक्ष, सभापतींनी दाखविली हिरवी झेंडी
अमरावती : लसीकरणाच्या कामाला अधिक वेग यावा म्हणून महापारेषण कंपनीने जिल्ह्याला १८ चारचाकी वाहने दिली आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख आणि आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर गुरुवार, २६ ऑगस्ट रोजी ही वाहने आरोग्य यंत्रणेत कार्यरत झाली. लसीकरणाचे काम आटोपल्यानंतर भविष्यात ही वाहने रुग्णवाहिका म्हणून उपयोगात आणली जाणार आहेत.
शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या महापारेषणने राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वात विदर्भातील ११ जिल्ह्यांना २०० वाहने पुरविली आहेत. यापैकी १८ वाहने जिल्ह्यासाठी आलेली ही वाहने १४ तालुक्यांना एक आणि जिल्हास्तरावर चार अशाप्रकारे वितरित केली आहेत. सध्या कोविड प्रतिबंधक लसीकरणात जिल्हा बऱ्यापैकी आघाडीवर आहे. सदर वाहने प्राप्त झाल्यामुळे लसीकरणाच्या कामाला अधिक गती प्राप्त होईल, असे मत अध्यक्ष बबलू देशमुख व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी व्यक्त केले.
लसीकरण वाहन म्हणून उल्लेखित असलेली ही वाहने आजपासून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रवाना झाली आहे. उर्वरित चार वाहने जिल्हा स्तरावर ठेवण्यात आली असून, त्या मान्यवरांद्वारा हस्तांतरण करण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंह गैलवार, दत्ता ढोमणे, गजानन राठोड, माजी उपाध्यक्ष सतीश हाडोळे, संदीप आमले, उपमुख्य कार्यपालन अधिकारी तुकाराम टेकाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीषा सूर्यवंशी, एनएचएमचे शशिकांत तभाने आदी मान्यवर उपस्थित होते.