बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:30 IST2020-12-12T04:30:03+5:302020-12-12T04:30:03+5:30
कावली वसाड : शासनाने प्लास्टिकबंदी जाहीर केल्यानंतरही जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर शासकीय यंत्रणेचा ...

बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर
कावली वसाड : शासनाने प्लास्टिकबंदी जाहीर केल्यानंतरही जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर शासकीय यंत्रणेचा अंकुश दिसत नसल्याने सर्वत्र प्लास्टिक कचरा बोकाळला आहे. धामणगाव रेल्वे शहर व ग्रामीण भागात आजही बिनदिक्कत भाजीपाला व फळांसाठी प्रतिबंधित कॅरीबॅग वापरली जात आहे.
शासनाने १ नोव्हेंबर २०११ पासून राज्यात प्लास्टिकबंदी केली. ३५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना ही बंदी आहे. मात्र, सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. बाजारात ग्राहक सर्रास प्लास्टिक पिशव्यांची मागणी करतात. प्लास्टिकचा कचरा वाढू लागल्याने शासनाने त्यावर बंदी आणली. परंतु, त्यानंतरही शासकीय यंत्रणेकडून अंमलबजावणी होत नसल्याने प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आले नाही. वजनाने हलक्या असल्याने प्लास्टिक पिशव्या हवेबरोबर वाहत जाऊन पाणीसाठे, जंगल आणि जमिनीवर साचतात. मोकाट जनावरे, जलचर प्राणी अन्न समजून या प्लास्टिक पिशव्या गिळतात. आतड्यात प्लास्टिक साचल्याने त्यांचा मृत्यू होतो. पावसाळ्यात प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारे कोंबून पाणी साचते. डबके निर्माण झाल्याने डासांची पैदास होऊन रोगराई निर्माण होते. एवढेच नाही तर प्लास्टिकमधील पॉलिमर जमीन, पाणी व अन्नसाखळी दूषित करतात. ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक बाब आहे. त्यासाठी प्लास्टिक पिशव्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
--------