पाणी शुध्दीकरणासाठी पीएसी पावडरचा वापर
By Admin | Updated: July 29, 2014 23:33 IST2014-07-29T23:33:16+5:302014-07-29T23:33:16+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहराला गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये आरोग्यविषयक भीती निर्माण झाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच कायम स्वरुपी उपाय

पाणी शुध्दीकरणासाठी पीएसी पावडरचा वापर
अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहराला गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये आरोग्यविषयक भीती निर्माण झाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच कायम स्वरुपी उपाय म्हणून पॉली अॅल्युमिनीया क्लोराईड (पीएसी) पावडरचा वापर करुन पाण्याचे निर्जंतुकीकरण तसेच गढळुता नष्ट करण्यात येणार आहे. यासाठी जीवन प्राधिकरणने दोन टन पीएसी पावडरणी मागणी नोंदविली आहे.
सिभोंरा धरणातून शहराला पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीत पावसामुळे विविध ठिकाणाहून पाण्याचे स्त्रोत वाढल्याने धरणातील पाणी ढवळले गेले. त्यामुळे पाण्याला गढुळ व भुरकट रंग आला आहे. दररोज अमरावती शहराला ९५ दशललिटर पाणीपुरवठा केला जात असून ते पाणी जलशुध्दीकरण केंद्रावर शुध्द करुन शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र गेल्या पाच दिवसांमध्ये नळाचे पाणी गढुळ येत असल्यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्यविषयक भीती वाटू लागली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये जीवन प्राधिकरण गढुळ पाण्याचा पुरवठा करत आहे. मात्र आजपर्यंत गढुळ पाणी स्वच्छ दिसण्याकरिता कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. पाणी शुध्द करण्याच्या प्रक्रियेत तुरटी व क्लोरीनचे प्रमाण वाढवून पाणी शुध्द केल्याचा दावा करुन जीवन प्राधिकरण मोकळे होत आहे. शुध्दीकरण केलेले गढुळ पाणी पिण्यास योग्य आहे, असे जीवन प्राधिकरणकडून सांगण्यात येत आहे. मात्र गढुळ पाण्यामुळे रोगराई पसरु शकते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गढुळ पाण्यामुळे आजाराचा फैलाव होऊ शकतो, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच जीवन प्राधिकरण अधिकारी खडबडून जागे झाले आणि जीवन प्राधिकरणाने जलशुध्दीकरण केंद्राकडे विषेश लक्ष देणे सुरु केले आहे. मात्र पाण्याची गढुळता पुर्णपणे नष्ट झाली नाही. त्यामुळे आता कायम स्वरुपी उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले जात आहे. याकरिता पाण्यात पॉली अल्युमिनीया क्लोराईड पावडर टाकण्यात येणार आहे.
सांडपाण्यातून गेलेल्या पाईपलाईनचे काय?
जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन काही भागात जीर्ण झाल्या आहेत. तसेच काही ठिकाणी पाईपलाईनमधून पाण्याची गळती होत आहे. जवळपास ३५ टक्के गळती होत असल्याचे अधिकाऱ्यांकडूनच सांगण्यात येत आहे. ही गळती थांबविण्याकरिता अजूनही पूर्णत: यश मिळालेले नाही. जीवन प्राधिकरणाच्या काही पाईपलाईन सांडपाण्यातूनसुध्दा गेल्या आहेत. त्या लिकेज होऊन ग्राहकांपर्यंत पोहचणाऱ्या पाण्याची शुध्दतेची हमी कोण देणार, असे नागरिकांचे म्हणणे आहे.