लाचखोरांची शक्कल खासगी व्यक्तींचा वापर
By Admin | Updated: December 26, 2015 00:01 IST2015-12-26T00:01:58+5:302015-12-26T00:01:58+5:30
सरकारी काम आणि त्यासाठी घेतली जाणारी लाच, हे परस्परपुरक समिकरण काही दशकांपासून समाजात रुढ झाले आहे.

लाचखोरांची शक्कल खासगी व्यक्तींचा वापर
कमिशनबाजी : वर्षभरात २१ दलाल गजाआड
अमरावती : सरकारी काम आणि त्यासाठी घेतली जाणारी लाच, हे परस्परपुरक समिकरण काही दशकांपासून समाजात रुढ झाले आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी लाचलुचपत खात्याचा जन्म झाला. सापळे यशस्वी होऊ लागले. अनेकजण गजाआड गेले. मात्र, आता या लाचखोरांनी त्यावरही ‘खासगी व्यक्तीं’चा जालिम उपाय शोधून काढला आहे.
लाच तर घ्यायचीच. मात्र, अगदी आवश्यकच असेल तरच समोर यायचे; एरवी एखाद्या खासगी व्यक्तीला भरीस पाडून, पैशांचे प्रलोभन दाखवून त्याच्या माध्यमातून लाच स्वीकारण्याचे प्रमाण वाढले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात यंदाच्या वर्षात अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबतच २१ खासगी दलाल आणि व्यक्ती अडकल्या. सन २०१४ मध्ये लाच स्वीकारणाऱ्या १८ जणांना ‘खासगी व्यक्ती’ म्हणून एसीबीने जेरबंद केले होते. लाच स्वीकारताना बदनामी टाळण्याचे धोरण असल्याने अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी मर्जीतील माणसे पोसल्याचे अनेक कार्यालयात उघडपणे दिसून येते.
अमरावती विभागात जानेवारी २०१५ ते डिसेंबर अखेरपर्यंत १३० गुन्ह्यात १८४ लाचखोरांना अटक केली. त्यातील खासगी व्यक्तिंचा आकडा २१ आहे. हा आकडा बराच बोलका आहे. पोलीस, महसूल आणि इतर विभागातील लाचखोर अधिकारी, कर्मचारी कारवाईपासून वाचण्यासाठी खासगी व्यक्तिंचा वापर करतात.
‘सेफ्टी’ साठी वापर
अमरावती : लोकसेवकांवर कठोर कारवाई होत असल्याने एखाद्या खासगी व्यक्तीच्या माध्यमातून लाच घेण्याचा - मागण्याचा प्रकारात वाढ झाली आहे. ‘सेफ्टी’ म्हणून हा फंडा वापराला जातो. पुढे पोलीस तपासात संबंधित लोकसेवकाला खासगी व्यक्तीच्या सहभागचा बेनिफिटही मिळतो. व्हाईस रेकॉर्डमधून वाचता येते. तथापि तपासात कुठेही व्यत्यय वा क्लिष्ठता येत नाही. आम्ही संबंधित लोकसेवकापर्यंत पोहोचतोच. लोकसेवक किंवा खासगी व्यक्तीही लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लगेचच तक्रार करा, असे आवाहन एसीबीचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे यांनी केले आहे. कोणतेही काम करुन घेण्यासाठी लाच देवू नका, प्रलोभनाला बळी पडू नका, असेही चिमटे यांनी म्हटले आहे.
लाचखोरीच्या पद्धती
प्रत्येक वेळी लाच थेट घेतली जाते, असे नाही. पोलीस खात्यात तर बहुतांश कनिष्ठ कर्मचाऱ्याला बळीचा बकरा बनविण्यात येते. अनेक प्रकारात एक जागा निश्चित करून त्या ठिकाणी रक्कम ठेवण्यास सांगितले जाते. लाचखोरीच्या एका प्रकरणात अडकलेल्या अमरावती जिल्हा परिषदेच्या ‘कॅफो ने तर लाच आणि ‘वरची’ रक्कम स्वीकारण्यासाठी आपल्या कक्षात खास अशी थर्माकोलची पेटी बनविली होती. ही बाब त्यावेळी अनेकांनी पाहिली होती. त्याशिवाय फोनवरुन संपर्क साधून लाचेची रक्कम एखाद्या विशिष्ट खात्यात जमा करण्यासही सांगितले जाते. अशा एक ना अनेक तऱ्हा वापरून लाचखोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस घट होण्याऐवजी वाढच होऊ लागली आहे.
जानेवारी ते डिसेंबर-२०१५ दरम्यान अमरावती विभाग लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने १३० दाखल गुन्ह्यांमध्ये १८४ जणांना अटक केली. त्यातही महसूल आणि पोलीस अव्वल राहिले. महसूल विरुद्ध ३० तर पोलीस विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्यांविरोधात २९ तक्रारी नोंदविण्यात आल्यात. एकूण ४४ व्यक्ती सापळ्यांमध्ये अडकल्या आहेत.
लाचखोरी प्रकरणात आपल्यावर बालंट येऊ नये म्हणून लोकसेवकांकडून खासगी व्यक्तींचा वापर अधिक प्रमाणात वाढला आहे. याअंतर्गत खासगी इसमांवरही कारवाई करण्याची तरतूद आहे.
- महेश चिमटे, पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
अमरावती.