अमेरिका, म्यानमारहून आलेले दाम्पत्य ‘होम क्वारंटाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:49+5:30
अमेरिकेतून एक दाम्पत्य १० मार्च रोजी आले. परंतु, इर्विन रुग्णालयात ते गुरुवारी दुपारी अडीच वाजता दाखल झाले. कोविड-१९ ची जगभरात दहशत पसरलेली असताना, मास्क न घालता आयसोलेशन वॉर्डापर्यंत ते धडकले. जिल्हा शल्यचिकित्सकांना नमस्कार करून गप्पादेखील केल्या. यावेळी सीएस निकम हे मास्क लावून त्यांच्याशी संवाद साधत होते.

अमेरिका, म्यानमारहून आलेले दाम्पत्य ‘होम क्वारंटाईन’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वेगवेगळ्या देशांतून १० दिवसांपूर्वी आलेल्या दाम्पत्यापैकी एकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात खुद्द जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांच्या स्वैर वर्तनाबद्दल खडसावले. गुरुवारी दुपारी अडीच वाजता त्यांचे थ्रोट स्वॅब नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती मिळाली आहे.
अमेरिकेतून एक दाम्पत्य १० मार्च रोजी आले. परंतु, इर्विन रुग्णालयात ते गुरुवारी दुपारी अडीच वाजता दाखल झाले. कोविड-१९ ची जगभरात दहशत पसरलेली असताना, मास्क न घालता आयसोलेशन वॉर्डापर्यंत ते धडकले. जिल्हा शल्यचिकित्सकांना नमस्कार करून गप्पादेखील केल्या. यावेळी सीएस निकम हे मास्क लावून त्यांच्याशी संवाद साधत होते. या दाम्पत्याने अमेरिकेहून १० मार्चला आल्याचे सांगताच, सीएसनी त्यांना तातडीने आयसोलेशन वॉर्डात बसविले आणि परिचारिकेने आणलेला मास्क लावण्यास दिला. आपण सुशिक्षित आहात, अमेरिकेतून आलात, देशभर कोरोनाची दहशत असताना इतके बेफिकीर कसे काय राहता, अशा शब्दांत जिल्हा शल्यचिकित्सकांनी आपला सात्त्विक संताप व्यक्त केला. यावर ते दाम्पत्य खजील झाले. तातडीने त्यांचे थ्रोट स्वॅब घेऊन तपासणीला पाठविण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधित डॉक्टरांना दिले. दुसरे दाम्पत्य म्यानमारहून १२ दिवसांपूर्वीच आले. मुलगा डॉक्टर असल्याने त्यांनी आधीच तपासणी केल्याची माहिती दिली. त्यांचेदेखील थ्रोट स्वॅब घेण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉक्टरांना दिले.
युरोपहून परतलेल्या तरुणीची सजगता
अंजनगाव सुर्जी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युरोप खंडातील युनायटेड किंगडम (यूके) या देशातून अंजनगावात परतलेल्या तरुणीने स्वत: ग्रामीण रुग्णालयात जाऊन प्रशासनास माहिती दिली. परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या या तरुणीची नागपूर विमानतळावर प्राथमिक तपासणी झाली होती. ती कोरोनाबाधित नसल्याची खात्री नागपूर विमानतळावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करून घेतल्यानंतर तिला १ एप्रिलपर्यंत स्वत:च्या घराबाहेर न पडण्याच्या अटीवर तिला गावी परतण्याची परवानगी मिळाली. गावी परतल्यानंतरही ती तरुणी तपासणीसाठी बुधवारी दुपारी ५ च्या सुमारास अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात आली. तेथे प्राथमिक तपासणी करून घेतल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याची सूचना करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.