अल्पवयीन मुलावर दोन अल्पवयिनांकडून अनैसर्गिक अत्याचार
By प्रदीप भाकरे | Updated: May 2, 2023 17:12 IST2023-05-02T17:12:08+5:302023-05-02T17:12:31+5:30
Amravati News एका अल्पवयीन मुलावर दोन अल्पवयिनांकडून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका गावात २९ एप्रिल रोजी दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली.

अल्पवयीन मुलावर दोन अल्पवयिनांकडून अनैसर्गिक अत्याचार
अमरावती : एका अल्पवयीन मुलावर दोन अल्पवयिनांकडून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका गावात २९ एप्रिल रोजी दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी ३० एप्रिल रोजी रात्री ८ च्या सुमारास १६ व १७ वर्षीय दोन अल्पवयिनांविरूद्ध अनैसर्गिक अत्याचार, पोस्को व ॲट्राॅसिटी अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, यातील अल्पवयीन मुलगा तालुक्यातील एका ठिकाणच्या यात्रेला गेला होता. २९ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास यातील दोन अल्पवयीन मुलांनी त्याला बाजूच्या शेतात नेले. तिथे दोघांनाही त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. वाच्यता वा आरडाओरड करू नये म्हणून त्यांनी त्याचे तोंड दाबले. अर्ध्या तासानंतर त्याने कशीबशी सुटका करवून घेत घर गाठले. दरम्यान त्रास असह्य झाल्याने पीडित मुलाने ती बाब पालकांना सांगितली. अखेर पालकांनी त्याला धीर देत त्याच्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. तथा त्याला सोबत घेऊन पोलिस ठाणे गाठले.