The unfortunate end of a woman with three childs drowned in the Chandrabhaga river; Two women serious | चंद्रभागा नदीत बुडून तीन चिमुकल्यासह एका महिलेचा दुर्देवी अंत; दोन महिला गंभीर

चंद्रभागा नदीत बुडून तीन चिमुकल्यासह एका महिलेचा दुर्देवी अंत; दोन महिला गंभीर

- मोहन राऊत

धामणगाव रेल्वे (अमरावती) : अधिक मास असल्याने गावाशेजारच्या चंद्रभागा नदीत कुटुंबासह आंघोळ व पूजेसाठी गेलेल्या तीन चिमुकले व एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. दोन महिलांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यश प्रमोद चवरे (११), जीवन प्रदीप चवरे (१५), सोहम दिनेश झेले (१२), असे मृत चिमुकल्यांचे व पुष्पा दिलीप चवरे (३२), असे मृत महिलेचे नाव आहे. बेबी प्रदीप चवरे (३५), राधा गोपाळराव मलीये (३८) यांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा राज या गावातील रहिवासी आहेत. 

सध्या अधिकमास असल्यामुळे हे कुटुंबीय रविवारी सकाळी ६ वाजता दरम्यान आंघोळ व पूजा करण्यासाठी गावाशेजारी असलेल्या चंद्रभागा नदीपात्रात गेले होते. मृत जीवन हा आपली आई बेबीसोबत गेला होता. तो धामणगाव येथील सेफला हायस्कूलमध्ये यंदा दहावी वर्गात शिकत होता. जीवनची आई बेबीची प्रकृती चिंताजनक आहे. मृत यश हा याच  हायस्कूलमध्ये सहावीत शिक्षण घेत होता, तर सोहम गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत होता. जखमी पुष्पा ही येथील पोलीस पाटील दिलीप चवरे यांची पत्नी आहे.

अशी घडली घटना
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सर्वजणांनी आंघोळ करण्यासाठी नदीपात्रात डुबकी घेतली. मात्र, नदीपात्रात पाणी अधिक असल्याने त्यांना बाहेर येणे शक्य झाले नाही. ही घटना गावात माहिती पडल्यानंतर ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेतली. ग्रामस्थांनीच तीन महिलांचे प्राण वाचवले. त्यांना धामणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना अमरावतीत हलविण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे यांनी दिली.

नदीची खोली तब्बल १० मीटर
निंभोरा राज या गावाशेजारी असलेल्या चंद्रभागा नदीचे पात्र मोठे नसले तरी या नदीचे गतवर्षी खोलीकरण करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सदर ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी न घेता समृद्धी महामार्गासाठी लागणाºया मुरूम माती उत्खननासाठी या नदीपात्रात तीन मीटर खोलीकरिता परवानगी देण्यात आली. मात्र, कंत्राटदारांनी या नदीतून अवैधरित्या अधिक माती काढल्याने नदीची खोली तब्बल १० मीटरपर्यंत पोहचली. त्यावेळी  येथील ग्रामस्थांनी नदी खोलीकरणाला विरोध दर्शविला होता. आजही पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडली असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
समृद्धी महामार्गासाठी माती काढण्याचा येथील ग्रामस्थांचा यापूर्वी विरोध होता. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारावर व प्रशासनावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे येथील माजी सरपंच सुधाकर  पांडे व जयंत बमनोटे यांनी सांगितले. आमदार प्रताप अडसड यांनी घटनेची अधिक चौकशी करण्याचे आदेश तालुका प्रशासनाला दिले आहे. धामणगावचे तहसीलदार भगवान कांबळे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, दत्तापूरचे पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

आणखी बातम्या...

- CoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा

-  सर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती     

- "हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली"    

- शेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात

- CoronaVirus News : सांगलीतील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन, शोध सुरु        

Web Title: The unfortunate end of a woman with three childs drowned in the Chandrabhaga river; Two women serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.