जिल्ह्यातील २८८ स्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य
By Admin | Updated: July 18, 2015 00:24 IST2015-07-18T00:24:41+5:302015-07-18T00:24:41+5:30
जून महिन्यात जिल्ह्यातील २८८ पाणी स्त्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल शासकीय आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे.

जिल्ह्यातील २८८ स्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य
आजाराचे प्रमाण वाढले : दीड महिन्यात ५३१ टायफाईडचे तर ६४१ डायरियाचे रुग्ण
वैभव बाबरेकर अमरावती
जून महिन्यात जिल्ह्यातील २८८ पाणी स्त्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल शासकीय आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे. त्यातच दीड महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात टायफाईडचे तब्बल ५३१, डायरियाचे ६४१ रुग्ण दाखल करण्यात आले होते. या शासकीय आकडेवारीवरून जिल्हा प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचे चित्र आहे.
दूषित पाण्यामुळे ७० टक्के आजार बळावण्याची शक्यता असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. शासनाने पाणी शुध्दीकरणाबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत. मात्र, जिल्हा प्रशासन पाणी शुध्दतेबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात दूषित पाणी व डांसाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रत्येक घरात एक व्यक्ती आजारी असल्याचे चित्र आहे. जून महिन्यात शासकीय आरोग्य प्रयोगशाळेने जिल्ह्यातील १ हजार ८२२ पाणी नमुन्यांची अनुजीव तपासणी केली. त्यामध्ये २८८ नमुने दूषित आढळून आली आहेत. ग्रामीण भागातील ९८७ पाणी नमुन्यांपैकी १९६ तर शहरी भागातील ८३५ नमुन्यांपैकी ९२ पाणी नमुने दूषित आढळून आले. सर्वाधिक दूषित पाणी ग्रामीण भागात असून महापालिका क्षेत्रातही २६ ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. ही स्थिती नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करीत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात १ जून ते १२ जुलैपर्यंत तापाचे तब्बल १ हजार २३४ रुग्ण दाखल करण्यात आले होते. १ हजार २८९ तापाच्या रुग्णांपैकी ५३१ रुग्ण टायफाईडचे पॉझिटिव्ह आढळून आलेत. त्यातच ६४१ रुग्ण डायरियाचे आढळून आले आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन पाणी शुध्दतेकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
उपविभागीय प्रयोगशाळेचे कार्य थंडबस्त्यात
ग्रामीण भागातील पाणी तपासणीकरिता जिल्ह्यात उपविभागीय प्रयोगशाळा उघडल्यात. आरोग्य विभागाने त्या प्रयोगशाळा व कंत्राटी कर्मचारी भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडे हस्तांतरित केले. तेव्हापासून पाणी तपासणीचे कार्य थंडबस्त्यात आहे. ही बाब शासनाच्या सर्व्हेक्षणातून लक्षात आल्यावर प्रधान सचिव राजेश कुमार यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
मजीप्राचे पाणी पिण्यास योग्य
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जून महिन्यात १८२ पाणी नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले. त्यामधील संपूर्ण पाणी नमुने पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. मजीप्राचे पाणी पिण्यास योग्य असल्याचे सांगितले.
दूषित पाणी व डांसाच्या प्रादुर्भावाने आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी उघडयावरील पाणी व अन्न पदार्थ खाणे टाळले पाहिजे. पाणी उकळून थंड करून पिणे गरजेचे आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाणी शुध्दतेकडे लक्ष द्यावे.
- सुनीता मेश्राम,
वैद्यकीय अधिकारी,
जिल्हा सामान्य रुग्णालय.