भुयारी मार्ग लोकार्पणात पालकमंत्री, खासदारांना डावलले
By Admin | Updated: October 26, 2015 00:25 IST2015-10-26T00:25:25+5:302015-10-26T00:25:25+5:30
बहुप्रतीक्षित नवाथे रेल्वे भुयारी मार्गाचा लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या थाट्यात पार पडला.

भुयारी मार्ग लोकार्पणात पालकमंत्री, खासदारांना डावलले
अमरावती : बहुप्रतीक्षित नवाथे रेल्वे भुयारी मार्गाचा लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या थाट्यात पार पडला. मात्र, या सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरुन पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ गायब असल्याचे दिसून आले. तर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेले आ. सुनील देशमुख, महापौर चरणजित कौर नंदा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार अनुपस्थित होते. या सोहळ्यात प्रमुख लोकप्रतिनिधी नसल्याबाबतची चर्चा जोरदार रंगली.
नवाथे रेल्वे भुयारी मार्ग निर्मितीसाठी मोर्चे, आंदोलने करण्यात आली. हा भुयारी मार्ग निर्मितीपूर्वी रेल्वे रुळ ओलांडून नागरिकांना येजा करावे लागत होते. मात्र हा प्रकार जीवघेणा ठरत असल्यामुळे भुयारी मार्ग निर्माण करण्यासाठी शासन प्रशासन स्तरावर जोरदार प्रयत्न करण्यात आले. या मार्गाच्या निर्मितीसाठी सुमारे १२.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्यामुळे महापालिकेने हा निधी उपलब्ध करुन दिला.
सोहळ्याला या नेत्यांची हजेरी
नवाथे रेल्वे भुयारी मार्गाच्या लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्याप्रसंगी मंचावर आ. रवी राणा, काँग्रेसचे पक्षनेता बबलू शेखावत, स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, नगरसेवक दिंगबर डहाके, दिनेश बूब, नितीन देशमुख, वनीता तायडे, नितीन मोहोड, मुन्ना मिश्रा, मुन्ना राठोड, सुनील काळे आदी उपस्थित होते.
ंरेल्वे भुयारी मार्गाचा लोकार्पण सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका मिळाली नाही. एवढेच नव्हे तर रविवारीे हा सोहळा असल्याची माहितीदेखील नव्हती. कार्यक्रमाची रितसर माहिती मिळाली असती तर नक्कीच उपस्थित राहिले असते.
- चरणजितकौर नंदा, महापौर, महापालिका.
पालकमंत्र्याची तारीख मिळाली नाही तर खासदारांना बोलावण्याचा प्रश्नच येत नाही. हा निधी महापालिकेने खर्च केला आहे. नवाथे रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असल्याने तो नागरिकांच्या सेवेत दाखल व्हावा, यासाठी लोकार्पण सोहळा घेण्यात आला. नगरसेवकांच्या पुढाकाराने हा मार्ग पुर्णत्वास आला आहे.
- दिगंबर डहाके, नगरसेवक, नवाथे प्रभाग.