अविश्वसनीय!

By Admin | Updated: June 3, 2016 00:09 IST2016-06-03T00:09:34+5:302016-06-03T00:09:34+5:30

गुरुवारी अविश्वसनीयच घडले. दिगंबर डहाके गेले. मुंबईत उपचारादरम्यान झालेल्या त्यांच्या अकाली मृत्यूची बातमी अंबानगरीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धडकली,

Unbelievable! | अविश्वसनीय!

अविश्वसनीय!

गुरुवारी अविश्वसनीयच घडले. दिगंबर डहाके गेले. मुंबईत उपचारादरम्यान झालेल्या त्यांच्या अकाली मृत्यूची बातमी अंबानगरीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धडकली, त्यावेळी ऐकणाऱ्या प्रत्येकाचे काळीजही धडकलेच.
गरिबी, संघर्ष आणि कर्तृत्त्वातून साकार झालेले व्यक्तिमत्त्व म्हणजे दिगंबर डहाके. वयाची जेमतेम पंचेचाळीशी गाठलेल्या या कार्यकर्त्याच्या लोकप्रियतेची उंची वयाच्या तुलनेत कैकपटीने अधिक होती.
महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारीपदी राबलेल्या वडिलांच्या पोटी जन्मलेल्या दिगंबर यांनी त्याच महापालिकेचे उपमहापौरपद भूषविले. माळीपुऱ्यातील आठ बाय वीस क्षेत्रफळाच्या घरात तीन भाऊ आणि बहिणीसह लहानपण घालविलेल्या दिगंबर यांनी गरिबी जवळून अनुभवली होती. खेळण्या-बागडण्याच्या, खेळणी घेऊन मागण्यासाठी आईवडिलांकडे हट्ट धरण्याच्या वयात त्यांनी कुंकू आणि अगरबत्ती निर्मितीच्या कारखान्यात कष्ट उपसले. स्वत:च्या कर्तव्याची जाण या उमद्या तरुणाला त्या वयापासूनच होती. 'जगावे की शिकावे' या कात्रित आयुष्य सापडले. त्यांनी आयुष्याची शाळा निवडली. पुस्तकांच्या शाळेत ते १२ वी पर्यंतच शिकले. आयुष्याच्या शाळेत मात्र ते कायम गुणवत्ता यादीत राहिले.
परिस्थिती नाही म्हणून रडत-कुढत आयुष्य जगण्याऐवजी परिस्थितीवर मात करून आयुष्य जिंकण्याच्या पर्यायाची निवड या लढवय्याने केली होती. विचारच माणसाच्या आयुष्याला आकार देतो. 'आयुष्य किती जगलात, यापेक्षा आयुष्य कसे जगलात', हे महत्त्वाचे सूत्र दिगंबरांच्या जगण्याची दिशा ठरवीत होते.
किशोरवयात प्रभात मंडळाशी ते जुळले. त्याचकाळी प्रवीण हरमकर यांच्याशी त्यांची घनिष्ट मैत्री झाली. या मंडळातूनच दिगंबर घडले. 'धाडस' हा दिगंबर यांचा 'रक्तगट'च. अन्याय दिसला की धमण्यांमधून वाहणारे रक्त उसळलेच म्हणून समजा. 'अन्याय सहन करणे म्हणजे अन्यायाला साथ देणे' हे महात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान हाडाचे शिवसैनिक असलेल्या दिगंबर यांच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरले होते. स्वत:ची वैचारिक भूमिका मांडण्याइतपत आणि त्या भूमिकेच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याइतपत वैचारिक अधिष्ठान दिगंबरांनी कमविले होते. तारूण्यात अन्यायाविरुद्ध पेटून उठताना दिगंबर यांची आक्रमक ओळख अमरावतीला झाली. १९९४ साली इंद्रपुरीत उसळलेल्या दंगलीदरम्यान त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या 'अँग्री यंग मॅन'ला समाजमानात आगळी मान्यता मिळाली. पुढे ओघानेच हा तरुण राजकारणात ओढला गेला. विविध प्रभागांतून सलग पाचवेळा हा तरुण नगरसेवकपदी निवडून गेला. कॅम्पसारख्या उच्चविद्याविभूषित आणि उच्चभ्रु लोकांनी दिगंबर यांना दोनवेळा प्रतिनिधीत्त्व बहाल केले. आक्रमकतेसोबतच वैचारिकतेला मिळालेली ती मान्यता ठरली.

Web Title: Unbelievable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.