हलाखीच्या परिस्थितीतून झाले उमेश न्यायाधीश
By Admin | Updated: March 14, 2016 00:12 IST2016-03-14T00:12:23+5:302016-03-14T00:12:23+5:30
परिस्थिती हलाखीची असताना सर्व समस्यांवर मात करून शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या उमेश भास्कर पेठे ...

हलाखीच्या परिस्थितीतून झाले उमेश न्यायाधीश
मुलाखत : गुरुजनांचे मार्गदर्शन सार्थक
संदीप मानकर अमरावती
परिस्थिती हलाखीची असताना सर्व समस्यांवर मात करून शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या उमेश भास्कर पेठे या विद्यार्थ्याने न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर ही परीक्षा उत्तीर्ण करून गरूडझेप घेतली आहे. उमेश यांनी येथील डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून एलएलबीची डिग्री प्राप्त केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी या परीक्षेचा निकाल १० मार्च रोजी जाहीर झाला असून उमेश पेठे हे या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
चांदूरबाजार तालुक्यातील तोंगलापूर या १२० लोकसंख्येच्या गावात अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात उमेशचा जन्म झाला. त्याचा मोठा भाऊ पोलीस म्हणून कार्यरत आहे. उमेशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद पिंपळखुटा येथून झाले. माध्यमिकचे शिक्षण जी.के. खापरे विद्यालय थूगाव येथून पूर्ण केले. परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्यांना शाळेपर्यंत पायी जावे लागत होते. पदवीपर्यंतचे शिक्षण जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदूरबाजार येथून पूर्ण केले. सन २००५ मध्ये वडिलाचे निधन झाल्याने कौटुंबिक परिस्थितीतून सावरून त्यांनी सन २००७ मध्ये एलएलबीची पदवी प्राप्त केली. मागील आठ वर्षांपासून ते अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करीत असून आतापर्यंत त्यांनी चारवेळी जेएमएफसीच्या परीक्षा दिल्यात. त्यांना सन २०१५ च्या परीक्षेत यश प्राप्त झाले.
उमेश सांगतो, स्वत:सोबत जर आपण प्रामाणिक राहिलो व अभ्यासात सातत्य ठेवल्यासच यश पदरी पडते. वकिलीमध्ये माझे सिनियर्स राजेंद्र तायडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. शिक्षण घेत असताना प्रकाश दाभाडे यांच्यासारखे गुरू लाभले व त्यांनी मला न्यायाधीश होण्याकरिता वेळोवेळी मार्गदर्शन केले.
न्यायाधीश होणे हे आपल्या आयुष्यातील सर्वोच्च स्वप्न असून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होण्याचे आपले स्वप्न गुरुजनांच्या मार्गदर्शनाने पूर्ण झाल्याचेही त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.