उज्ज्वल निकम राजकारणात येणार; राजकारण हे उत्तम क्षेत्र असल्याचं मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 07:03 IST2020-12-29T01:51:41+5:302020-12-29T07:03:08+5:30
ॲड. निकम यांनी सोमवारी ‘लोकमत’च्या अमरावती कार्यालयास भेट दिली.

उज्ज्वल निकम राजकारणात येणार; राजकारण हे उत्तम क्षेत्र असल्याचं मत
गणेश देशमुख
अमरावती : राजकारण हे उत्तम क्षेत्र आहे. मोजक्या काही मंडळींमुळे अवघे राजकीय क्षेत्रच वाईट असल्याचा निष्कर्ष काढणे चूक आहे, असे सांगतानाच राजकारणात प्रवेश करणार काय, या प्रश्नावर बघू असे सूचक उत्तर प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी दिले. यापूर्वी शरद पवार यांनीही आपणांस खासदारकीबाबत विचारणा केली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
ॲड. निकम यांनी सोमवारी ‘लोकमत’च्या अमरावती कार्यालयास भेट दिली. यावेळी ते म्हणाले, लोकप्रतिनिधी आभाळभर काम करतात. लोकांच्या प्रचंड उंचावलेल्या अपेक्षांमुळे ते कायम व्यस्त असतात. त्यांना सतत प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधींच्या वाहनांवर पूर्वी चमचमणारा लाल दिवा असायचा. तो त्यांच्या वेगवान तरीही सुरक्षित प्रवासासाठीच; परंतु ‘व्हीआयपी’ संस्कृतीचे प्रतीक संबोधून तो काढून टाकला गेला. लोकप्रतिनिधींच्या वाहनांवर लाल दिवा आवश्यक आहे.
न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल करणे आवश्यक असल्याचे सांगून ते म्हणाले, साखळी न्यायव्यवस्थेत कुणावरही जबाबदारी निश्चित होत नाही. त्यामुळे सामान्यांच्या मनात न्यायाविषयी शंका असते ‘शंभर गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एकाही निर्दोषाला शिक्षा होता कामा नये,’ या तत्त्वावर जर न्यायव्यवस्था काम करीत असेल, तर न्यायव्यवस्थेतील चुकांची जबाबदारीही निश्चित व्हायला हवी. मी कायदे तयार करणाऱ्या सभागृहात गेलो, तर न्यायव्यवस्थेत आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी काम करेन, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.