निंभीनजीक दोन चारचाकींमध्ये दुचाकीचा चुराडा, दाम्पत्य ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST2019-11-04T06:00:00+5:302019-11-04T06:00:38+5:30
नाजुकराव तायडे हे पत्नी शालिनीसह निंभी येथे त्यांच्या आजारी मेव्हणीची प्रकृती बघण्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच २७ एएस ६५३० ने मोर्शीकडे जात होते. त्याचवेळी एमएच २७ बीई ००८४ क्रमांकाची चारचाकी वरूडकडून अमरावती, तर एमएच ३१ सीटी ९२२० या क्रमांकाची चारचाकी अमरावतीवरून मोर्शीकडे जात होती.

निंभीनजीक दोन चारचाकींमध्ये दुचाकीचा चुराडा, दाम्पत्य ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
लेहगाव/नेरपिंगळाई : दोन भरधाव चारचाकी वाहनांच्या मधात दुचाकी अडकून झालेल्या अपघातात दाम्पत्य ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी मोर्शी-अमरावती मार्गावरील लेहगावनजीकच्या निंभीजवळ घडली. अपघातात दुचाकीचा चुराडा झाला. नाजुकराव उदेभान तायडे (४०), शालिनी नाजूकराव तायडे (३५, दोन्ही रा. कठोरा बु.) अशी मृतांची नावे आहेत.
नाजुकराव तायडे हे पत्नी शालिनीसह निंभी येथे त्यांच्या आजारी मेव्हणीची प्रकृती बघण्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच २७ एएस ६५३० ने मोर्शीकडे जात होते. त्याचवेळी एमएच २७ बीई ००८४ क्रमांकाची चारचाकी वरूडकडून अमरावती, तर एमएच ३१ सीटी ९२२० या क्रमांकाची चारचाकी अमरावतीवरून मोर्शीकडे जात होती. या चारचाकीने एमएच २७ बीई ००८४ या क्रमांकाच्या चारचाकीला जबर धडक दिली. अपघात टाळण्यासाठी एमएच २७ बीई ००८४ च्या चालकाने वाहन वळविताना नाजुकराव यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात ते दाम्पत्य २५ ते ३० फूट अंतरावर फेकल्या गेले. या अपघातात नाजुकराव यांच्या दुचाकीचे दोन तुकडे झाले. अपघातानंतर नाजुकराव यांचा एक पाय धडावेगळा झाला. अपघातानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय तट्टे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेद्वारे जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्यानंतर डॉक्टरांनी तायडे दाम्पत्यांना मृत घोषित केले. या घटनेच्या माहितीवरून तायडे कुटुंबीयांसह त्यांचे नातेवाईक इर्विन रुग्णालयात धावून आले. तायडे दाम्पत्याचा मृतदेह पाहून नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश सुरू झाला. नाजुकराव तायडे दाम्पत्यांना अक्षय, अजय व संजीवनी अशी तीन अपत्ये आहेत. या घटनेचा पंचनामा शिरखेडचे दुय्यम ठाणेदार चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार विनोद साबळे, देशमुख यांनी केला. गुन्ह्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
इर्विन रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
या घटनेनंतर मृताच्या मुला-मुलींस नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. आई-वडिलांना मृतावस्थेत पाहून त्यांनी टाहो फोडला. या हृदयद्रावक घटनेने नातेवाईकांनीही आक्रोश केल्याने रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. नाजुकराव हे अमरावतीतील महावीर मार्केटस्थित एका कापड व्यावसायिकाकडे कार्यरत होते. सुटीच्या दिवशी गावोगावी फिरून ते कापड विक्री करायचे. कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबीयावर दु:खाचे डोंगर कोसळले.