नागपूर औरंगाबाद हायवेवर दोन ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2022 14:33 IST2022-08-05T14:28:33+5:302022-08-05T14:33:44+5:30
शिंगणापूर फाट्यानजीकची घटना

नागपूर औरंगाबाद हायवेवर दोन ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा जागीच मृत्यू
अमरावती : नागपूर औरंगाबाद हायवेवरील शिंगणापूर फाट्याजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची घटना काल (दि. ४) रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात तीन जण ठार झाले.
औरंगाबादकडून नागपूरकडे कांदा वाहून नेणारा ट्रक (सी जी 04 एच झेड 8154) व नागपूरकडून औरंगाबादकडे लोखंडी रॉड वाहून नेणारा ट्रक (आर जे 04 सीजी 2258) हे दोघेही समोरासमोर धडकल्याने हा अपघात घडला.
ही घटना कळताच नांदगावचे ठाणेदार विशाल पोळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कांबळे, विवेक राणे, गोपाल तायडे व नांदगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. औरंगाबादकडून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकमधील जखमी वाहक सर्वेश कुमार यादव वय 36 याला उपचारासाठी येथील दवाखान्यात नेण्यात आले होते, पण तो दगावला. तसेच नागपूरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकमधील चालक व वाहक दोन्ही या अपघातात जागीच ठार झाले.
हा अपघात एवढा भीषण होता की दोन्हीही ट्रकचा पुढील भागाचा पार चेंदामेंदा झाला. ट्रकमधील चालक - वाहक दोघांचे मृतदेह ट्रकमध्ये अडकले होते. त्यांना काढण्यासाठी अमरावती महानगरपालिकांचे वरड वाहन व अग्निशमन दलाच्या पथकाला बोलावण्यात आले. या दोन्ही मृतकाचे नाव वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही. याप्रकरणी पुढील तपास पोलीस तपास पो. कॉ. विवेक राणे हे करत आहे.