दोन जण वाहून गेले, २४ हजार हेक्टरला फटका
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 28, 2023 20:12 IST2023-07-28T20:12:26+5:302023-07-28T20:12:38+5:30
पश्चिम विदर्भात २३ मंडळात अतिवृष्टी, ६०० घरांची पडझड, १० जनावरे मृत

दोन जण वाहून गेले, २४ हजार हेक्टरला फटका
अमरावती : पश्चिम विदर्भात २४ तासांपासून दमदार पाऊस होत आहे. यामध्ये २३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आले. यामध्ये अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी एक जण पुरात वाहिला, तर १० जनावरांचा मृत्यू झाला. याशिवाय ६०० घरांची पडझड झालेली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्राथमिक अहवालानुसार २७ जुलै रोजी अमरावती जिल्ह्यात १८ व यवतमाळ जिल्ह्यात २२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली, घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अमरावती जिल्ह्यात ५ तर अकोला जिल्ह्यात ४७ असे एकूण ५२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहेत. याशिवाय अमरावती जिल्ह्यात २, यवतमाळ ८ असे एकूण १० जनावरांचा मृत्यू या आपत्तीमध्ये झालेला आहे.
सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यात ११७ व यवतमाळ जिल्ह्यात ४७२ असे एकूण ५८९ घरांची पडझड झालेली आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यात ९९०३, यवतमाळ जिल्ह्यात १३८९५ असे एकूण २३७९८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. पुरामुळे काठालगतची ३० हेक्टर जमीन खरडल्या गेल्याचे प्रशासनाने सांगितले.