नोकरीच्या नावावर दोघांना साडेसात लाखांनी गंडविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:29 IST2025-01-15T11:26:34+5:302025-01-15T11:29:16+5:30
पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील घटना

Two people were duped of Rs 7.5 lakh in the name of jobs
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नोकरीचे आमिष दाखवून दोन सुशिक्षित बेरोजगारांना साडेसात लाख रुपयांनी गंडविले. ही घटना १३ जानेवारीला नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. फसवणूक झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरून पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आशुपाल ग्यानबा ठोसरे (२४, रा. पिंपळगाव सोनार, बुलडाणा), श्याम भगवंतराव कुणबीथोप (३६, रा. वाळगाव, नांदगाव खंडेश्वर), शिवा रूपराव बन्सोड (३७, रा. अडगाव, मोर्शी), चेतक राजकुमारसिंह हुशारे (४३, रा. दर्यापूर) व मोहन लालसिंह सोळंके (३१, रा. चिखली, बुलडाणा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी अक्षय सुधाकर ठोसरे (२४, रा. पिंपळगाव सोनार, बुलडाणा) यांना औषध निर्माता अधिकारी म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये ऑनलाइन २ लाख ५० हजार रुपये घेतले. आरोपींनी अक्षयचा मित्र नितीन मधुकर तायडे (२९, रा. बुलडाणा) यांनासुद्धा विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पाच लाख रुपये उकळले. पोलिस चौकशीत या दोघांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.