अमरावती जिल्ह्यात दोन जण गेले वाहून; एक चारचाकी, दोन दुचाकींना जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 19:58 IST2022-08-08T19:58:22+5:302022-08-08T19:58:46+5:30
Amravati News मोर्शी तालुक्यात सालबर्डी येथील माडू नदीच्या पुरात महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या दोन दुचाकी व एक चारचाकी वाहून गेली. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली.

अमरावती जिल्ह्यात दोन जण गेले वाहून; एक चारचाकी, दोन दुचाकींना जलसमाधी
अमरावती : मोर्शी तालुक्यात सालबर्डी येथील माडू नदीच्या पुरात महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या दोन दुचाकी व एक चारचाकी वाहून गेली. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. त्यापाठोपाठ मोर्शी शहरातील मध्य भागातून वाहणाऱ्या आठवडी बाजार ते पेठपुरा भागातून जाणाऱ्या दमयंती नदीच्या पुरात ३५ वर्षीय युवक दुपारी ४ वाजता वाहून गेला. काही अंतरावर चारचाकी वाहन व युवकाचा मृतदेह आढळून आला. सायंकाळी ६ नंतर वरूड तालुक्यातील सोकी नदीत एक जण वाहून गेला आहे.
श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्याने अनेक भाविक दुचाकी, चारचाकीने सालबर्डी येथील शिवगुंफेत असलेल्या शिवलिंगावर बेलपत्री वाहण्यासाठी येत असतात. अशाच भाविकांच्या दोन दुचाकी आणि एक चारचाकी वाहन सालबर्डी येथील गंगामेळ संगमापासून माडू नदीच्या पुरात वाहत गेले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहत गेलेली चारचाकी सालबर्डी गावात जाणाऱ्या पुलाजवळ तुटलेल्या अवस्थेत आढळून आली. एमएच २८ - व्ही ३१४२ असा वाहनाचा क्रमांक आहे.
सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मोर्शी शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या दमयंती नदीच्या पुलावर पाणी असल्याने आठवडी बाजाराकडून पेठपुऱ्याकडे जाणारा मार्ग बंद झाला होता. शहरातील गिट्टीखदान भागात राहणारा सरफराज खाँ पीर खाँ (४०) याला आजीने दळण आणण्यासाठी आठवडी बाजारातील चक्कीवर पाठविले होते. त्याच्यासोबत पाळीव श्वानदेखील होता. दळण घेऊन घरी जात असताना आठवडी बाजारानजीक दमयंती नदीच्या पुलावर तो आला. त्यावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात श्वान काही अंतर चालून गेला. त्याला मागे आणण्यासाठी गेलेल्या फारुख खानचा पाय घसरला आणि तो पुराच्या पाण्यात वाहत गेला. सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरून त्याचा मृतदेह नागरिकांनी काढला.
सोकी नदीच्या पुरात इसम गेला वाहून
वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड येथून सोकी नदीच्या पुरात सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास शेतातून येत असताना शेषराव ऊर्फ भुरा किसनराव युवनाते (५६, रा. गव्हाणकुंड) हा इसम वाहून गेला. सोकी नदीच्या पात्रात अचानक पाणी वाढल्याने ही घटना घडली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर, एपीआय वैभव महांगरे, जमादार सुनील आकोलकर यांच्यासह नागरिकांकडून शोधकार्य सुरू आहे.