कृषी प्रदर्शनीला दोन लाख शेतकऱ्यांनी दिल्या भेटी
By Admin | Updated: April 14, 2016 00:09 IST2016-04-14T00:09:45+5:302016-04-14T00:09:45+5:30
स्थानिक सायन्सकोर मैदानात कृषी विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी प्रदर्शनीला

कृषी प्रदर्शनीला दोन लाख शेतकऱ्यांनी दिल्या भेटी
जनजागृती : प्रबोधन, तंत्रज्ञानातून विकासाचे पाऊल
अमरावती : स्थानिक सायन्सकोर मैदानात कृषी विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी प्रदर्शनीला सुमारे दोन लाख शेतकऱ्यांनी भेटी देऊन प्रबोधन व तंत्रज्ञानातून विकासाकडे वाटचाल करणाबाबतच्या टिप्स घेतल्या आहेत. या प्रदर्शनीच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
१० एप्रिलपासून सुरु झालेल्या कृषी प्रदर्शनीला शेतकरी तसेच जिल्हा भरातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. प्रदर्शनीतील विविध उपक्रम, स्टॉल्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच तंत्रज्ञानाचा लाभ देखील घेतला. याप्रदर्शनीत १०० स्टॉल खासगी कंपन्यांनी लावून विविध शेतीपयोगी साहित्याची माहिती शेतकऱ्यांना दिली. ९० बचत गटांचे स्टॉल, पाणंद रस्ते व जलयुक्त शिवाराची माहिती देणारे स्टॉल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले. अत्याधुनिक मशिनीद्वारे शेतीचे उत्पादन कसे वाढविता येईल, यासंबंधीत स्टॉलला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. धान्य महोत्सवात उत्कृष्ट धान्य विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेक नागरिकांनी या धान्याची खरेदी सुध्दा केली. कांदा, हळद व अन्य साहित्याच्या स्टॉलवरही शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. विविध फळांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. विविध वनस्पतींपासून तयार केलेल्या औषधींच्या स्टॉलवर नागरिकांची एकच गर्दी होती. कृषी पंप, शेतीपयोगी मशीन, ट्रॅक्टर विक्री, बी-बियाणे, फूड झोन आदींचे स्टॉल शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरले.
सौर ऊर्जेवरील उपकरणे शेतकऱ्यांसाठी लाभदायक
कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून विविध कंपन्यांनी सौर ऊर्जेवरील उपकरणांचे स्टॉल लावले होते. सौरऊर्जा उपकरणांचा उपयोग करून शेतीचा विकास कसा करता येऊ शकतो, याबद्दल महाऊर्जा अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये महाऊर्जाचे महासंचालक नितीन गद्रे, यू.एम.पांडे, एन.टी.बागल, आर.एम.गरड व वैद्य यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे आधुनिक तंज्ञत्रानातून साकारलेली सोलरपंप प्रणाली शेतीसाठी अत्यंत उपयोगी ठरणारी होती. यामध्ये शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सोलर पंप उपलब्ध होते. याबाबत हर्षल खोडस्कर, प्रमोद जवंजाळ व राहुल बिजवे आदींनी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सोलरवरील स्ट्रीट लाईट, पाणी गरम करणारे उपकरण आदी साहित्य प्रदर्शनीत ठेवण्यात आले होते.