...ती भेट ठरली अखेरची, आजीच्या भेटीला गेलेल्या दोन मित्रांवर काळाची झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2022 13:42 IST2022-10-20T13:33:38+5:302022-10-20T13:42:04+5:30
चिंचखेड फाट्यावर घडला अपघात

...ती भेट ठरली अखेरची, आजीच्या भेटीला गेलेल्या दोन मित्रांवर काळाची झडप
अमरावती : दसऱ्याला घेतलेली नवीन दुचाकी घेऊन आजीला दाखविण्याकरिता गेलेल्या दोन मित्रांवर परत येताना काळाने झडप घातली. माहुली जहांगिर ठाण्याच्या हद्दीतील चिंचखेड फाट्यावर मंगळवारी रात्री घडलेल्या ट्रॅव्हल्स आणि दुचाकी अपघातात त्या दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला. विशाल बनसोड (१८), सुदर्शन झटाले (२०, दोघेही रा. रेवसा) अशी मृत मित्रांची नावे आहेत. बुधवारी दुपारी रेवसा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दसऱ्याच्या दिवशी विशालने नवीन दुचाकी घेतली. त्याच दुचाकीने मंगळवारी सुदर्शन आणि विशाल दोघेही वाघोली या ठिकाणी सुदर्शनच्या आजीच्या भेटीला गेले होते. आजीची भेट घेऊन दोघेही घरी परतत असताना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये विशाल आणि सुदर्शन दोघांनाही गंभीर दुखापत होऊन घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
माहुलीचे ठाणेदार प्रवीण वेरुळकर यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले होते. बुधवारी सकाळी दोघांचेही शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या गावी रेवसा येथे अंत्यसंस्कार पार पडले.