दोन कॉलने केला दरोड्याचा उलगडा
By Admin | Updated: August 5, 2014 23:13 IST2014-08-05T23:13:34+5:302014-08-05T23:13:34+5:30
जयस्तंभ चौकातील खंडेलवाल ज्वेलर्स प्रतिष्ठानावर दरोडेखोरांनी ३१ आॅगस्ट २०१० रोजी भर दुपारी दरोडा घालून बंदुकीच्या धाकावर ३२ लाख ९९ हजार १७५ रुपयांचा ऐवज लुटून नेला होता.

दोन कॉलने केला दरोड्याचा उलगडा
खंडेलवाल ज्वेलर्स दरोडा प्रकरण : १७०० पानांचे दोषारोपत्र, १२० पानांचा निकाल
प्रसन्न दुचक्के - अमरावती
जयस्तंभ चौकातील खंडेलवाल ज्वेलर्स प्रतिष्ठानावर दरोडेखोरांनी ३१ आॅगस्ट २०१० रोजी भर दुपारी दरोडा घालून बंदुकीच्या धाकावर ३२ लाख ९९ हजार १७५ रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. शहर हादरुन सोडणाऱ्या या बहुचर्चित दरोड्याचा शहर पोलिसांनी वैज्ञानिक पद्धतीने तपास केला. दरोडेखोराने ज्वेलर्समधून केलेल्या दोन सेकंदाच्या कॉलने या दरोड्याचा पोलिसांनी उलगडा केला व अकरा आरोपींना अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी दरोड्याच्या कलमासह संघटीत गुन्हेगार कायद्याअंतर्गत कारवाई करुन १७०० पानांचे दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले होते. याप्रकरणी येथील न्यायालयाने १२० पानांचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यामध्ये आठ आरोपींविरुद्द दोष सिद्ध झाला व न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तीन जणांविरुद्ध ठोस पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली.
३१ आॅगस्ट २०१० रोजी दुपारी २ वाजताची वेळ होती. जयस्तंभ चौकात वर्दळ असतांना दरोडेखोर खंडेलवाल ज्वेलर्स प्रतिष्ठानावर दरोडा घालण्यासाठी पोहचले. सिनेस्टाईल तीन युवक प्रतिष्ठानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने शिरले. यातील दोन जण तेथे अंगठी पाहत होते. दुकानात ग्राहक नसल्याचे पाहून प्रतिष्ठानात शिरलेल्या एकाने बाहेर उभ्या त्याच्या साथीदाराला दहा सेकंदात दोन कॉल केले आणि यातच ते अडकलेत.