बंद करा ‘ती’ ग्रेडेशन पध्दती !

By Admin | Updated: October 20, 2015 00:23 IST2015-10-20T00:23:29+5:302015-10-20T00:23:29+5:30

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा आहे.

Turn off 'she' grading method! | बंद करा ‘ती’ ग्रेडेशन पध्दती !

बंद करा ‘ती’ ग्रेडेशन पध्दती !

‘लोकमत’मध्ये मंथन : मुख्याध्यापकांचा सूर, पालकांना सजगतेचे आवाहन
लोकमत परिचर्चा
अमरावती : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा आहे. यामुळे गरीब, सामान्य घरातीलच नव्हे तर श्रीमंत विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक भवितव्य कोमेजून जाईल, अशी भीती व्यक्त करताना ‘लोकमत’मध्ये एकत्र आलेल्या नामांकित शाळांच्या मुख्याध्यापक-प्राचार्यांनी ‘ग्रेडेशन पध्दत’ बंद करण्याची आग्रही भूमिका घेतली. शनिवारी नामवंत शाळांच्या मुख्याध्यापक-प्राचार्यांनी ‘लोकमत’ कार्यालयात शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर मंथन केले.
शिक्षक-मुख्याध्यापकांवर अशैक्षणिक कामे लादली गेल्याने अध्यापनाशिवाय शिक्षकांवर ताण येतो. अशा स्थितीत गुणवत्तेची आस का धरायची? शिक्षकांवरच प्रयोग केले जातात. बुकेऐवजी बुक द्या, हे जीआर काढून सांगावे लागते. पालकांची भूमिकाही फक्त शिष्यवृत्तीपुरती मर्यादित राहिली आहे. अशैक्षणिक कामाच्या ओझ्यामुळे शाळेत अध्यापन बंद आहे. ‘समर्पित’ शिक्षक आता राहिले नाहीत. समाजाचा शिक्षकांवर विश्वासच उरलेला नाही. आम्ही संत्रस्त झालो आहोत, असा सामूहिक सूर मुख्याध्यापकांच्या या चर्चेतून निघाला. शिक्षणाविषयीचे धोरण बदलविण्याची आग्रही भूमिका या मुख्याध्यापकांनी मांडली. शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवायची असेल तर एकूणच शिक्षण व्यवस्थेवर मंथन व्हावे, त्यातून बाहेर येणाऱ्या समस्यांवर चर्चा व्हावी, योग्य ती मते विचारात घेऊन त्यावर अंमलबजावणी करावी. विचारवंतांकडून आणि जाणकारांकडून उपाययोजना मागवाव्यात. काय केल्यास शिक्षण विभागातील गोंधळ दूर करता येईल, याबाबत प्राधान्याने विचार करावा, असा सूर या परिचर्चेतून उमटला. सर्वच मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी या परिचर्चेत मनमोकळ्या पध्दतीने मते मांडलीत. संस्कारांचे बीज रोवल्याशिवाय गुणवान आणि सुसंस्कारित पिढी घडणार नाही, असे मत बहुतांश शिक्षक-मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.

विद्यार्थीही बदलले !
द्रोणाचार्य आणि एकलव्यासारखे तर सोडाच, पण मागच्या पिढीपर्यंत दृढ असणारे विद्यार्थी-शिक्षकांचे नाते आज राहिलेले नाही. भल्यासाठी विद्यार्थ्यांना एखादी चापट मारल्यास पालक अंगावर धावून येतात. मुले शाळेत शिवीगाळ करतात. सर ऐवजी मास्तर असे एकेरी संबोधतात. पालकांनाही मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज वाटत नाही. शिक्षकांचा सन्मान होत नसल्याने मग शिक्षकही जशास तसे’ वागतात, असा सूर बैठकीदरम्यान निघाला.

आदरच उरला नाही
चार दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याने एका शिक्षिकेच्या केसांना 'च्युर्इंगम' लावले. त्यानंतर त्याच्या पालकांना बोलावून घेतले असता त्यांनी शिक्षकांनाच धमकावले. त्यामुळे आज समाजात शिक्षकांबद्दल आदरच उरलेला नाही, अशी खंत मुख्याध्यापकांनी यावेळी व्यक्त केली. घराघरातून शिक्षकांविषयीच्या आदराचे बिजारोपण व्हावे, गुरूंची जीवनातील भूमिका विद्यार्थ्यांच्या पचनी पडावी, असा आग्रह त्यांनी धरला.

शिष्यवृत्ती ‘मर्ज’ व्हावी
सध्या २२ प्रकारच्या शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी वेगवेगळे अर्ज, कागदपत्रे द्यावी लागतात. त्याचा ससेमिराही मुख्याध्यापकांच्या मागे आहे. त्यामुळे यासर्व शिष्यवृत्ती योजना एकाच योजनेत 'मर्ज' करून त्यात सुसूत्रता आणावी, असे मत मुख्याध्यापकांनी मांडले. विविध कामांचे ओझे शिक्षकांच्या मानगुटीवरून उतरविल्यास शिक्षकांना अध्यापनाकडे अधिक लक्ष देता येईल. असे झाल्यास गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्नही होईल.

मुलींचा सिव्हील ड्रेस दफ्तरात
शाळेचा गणवेश घालून येणाऱ्या अनेक विद्यार्थिनी सिव्हील ड्रेस दफ्तरात आणतात. शाळेतून बाहेर पडल्यावर पालकांनाच मुलगी ओळखू येत नाही. वडाळीच्या बगिच्यात इयत्ता ८ वी, ९ वीच्या मुलींचा सर्वाधिक वावर असतो, असा गौप्यस्फोट एका मुख्याध्यापिकेने केला. शाळेतील विद्यार्थ्यांना संपर्कासाठी मोबाईल द्यायचाच असेल तर साधा द्या, अ‍ॅन्ड्रॉईडची गरजच काय, असा सवाल करीत पालकांनीही पाल्यांना सुविधा पुरविण्यासाठी सजग राहण्याचे आवाहन मुख्याध्यापकांनी केले.

Web Title: Turn off 'she' grading method!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.