ट्रक चालकाने विकला कांदा, व्यापाऱ्याचा झाला वांदा
By Admin | Updated: July 26, 2014 23:53 IST2014-07-26T23:53:31+5:302014-07-26T23:53:31+5:30
व्यापाऱ्याचा कांदा ट्रकमध्ये घेऊन जाणाऱ्या चालकाने वाटेतच परस्पर कांदा विकून व्यापाऱ्याचा मोठा वांदा केला. वलगाव पोलीस ठाण्यांतर्गत शनिवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली.

ट्रक चालकाने विकला कांदा, व्यापाऱ्याचा झाला वांदा
पोलीस ठाण्यात तक्रार : आरोपी गजाआड
अमरावती : व्यापाऱ्याचा कांदा ट्रकमध्ये घेऊन जाणाऱ्या चालकाने वाटेतच परस्पर कांदा विकून व्यापाऱ्याचा मोठा वांदा केला. वलगाव पोलीस ठाण्यांतर्गत शनिवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली. रमेश महादेव मडावी (३२,रा. पांढुर्णा खुर्द ता. घाटंजी) असे परस्पर कांदा विक्री करणाऱ्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
यवतमाळ येथील सारस्वत ले-आऊट येथील रहिवासी रौनक अली रौऊफ अली हे ट्रान्सपोर्टचे व्यापारी आहेत. त्यांच्या एम. एच. ३४ एम ७९६ क्रमांकाच्या ट्रकवर रमेश मडावी हा दोन महिन्यांपासून चालक आहे. रमेशने अचलपूर येथील बालाजी ट्रान्सपोर्ट येथून रामविजय भैयालाल जटीये यांच्याकडून १ लाख ७० हजार रुपये किमतीचे २३७ पोते कांदे ट्रकमध्ये भरले. शुक्रवारी रात्री ८ वाजता तो कांदा घेऊन आंध्रप्रदेशातील निजामाबाद येथे मो. सलीम अॅन्ड कंपनीमध्ये जाण्यासाठी निघाला. वलगाव येथे त्याने तेथे दारु ढोसली. तेथे कांद्याचे कट्टे विकणे सुरु केले. तेथील सुफीनगरात रमेश हा स्वस्त दरात कांदा विक्री करीत असल्याची माहिती वलगाव येथील रहिवासी बंडून कलाने यांना मिळाली. त्यांनी रमेशकडून २०० रुपये प्रती कट्ट्याने १२० कट्टे कांदा खरेदी केले. ही कांद्याची पोती कलाने याने त्याच्या ट्रॅक्टरमध्ये भरली. कमी भावात ते गावात कांदा विकत होते. ही बाब तेथील काही नागरिकांच्या निदर्शनास आली. संशयाच्या आधारावर त्यांनी ही माहिती वलगाव पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक आर. के. शर्मा, उपनिरीक्षक सपाटे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मडावी व कलाने या दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान रमेशने मालकाची फसवणूक करुन वाटेतच कांद्याची परस्पर विक्री केल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. ही माहिती त्यांनी ट्रक चालक रौनक अली यांना दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी रमेश मडावीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. आरोपीच्या ताब्यातून १२५ पोते कांदा जप्त करण्यात आले. (प्रतिनिधी)