ट्रान्सपोर्टनगरसमोरील मार्गावर ट्रकची पार्किंग
By Admin | Updated: July 17, 2017 00:15 IST2017-07-17T00:15:47+5:302017-07-17T00:15:47+5:30
चांदणी चौकापासून ते वलगावकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील ट्रान्सपोर्ट नगरनजीक मुख्य रस्त्यावर नियमबाह्य शेकडो ट्रकांची अवैध पार्किंग करण्यात येत आहे.

ट्रान्सपोर्टनगरसमोरील मार्गावर ट्रकची पार्किंग
अपघाताची शक्यता : रस्त्यावर उभी केली जातात वाहने
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चांदणी चौकापासून ते वलगावकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील ट्रान्सपोर्ट नगरनजीक मुख्य रस्त्यावर नियमबाह्य शेकडो ट्रकांची अवैध पार्किंग करण्यात येत आहे. त्यामुळे या ट्रकांचा इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्यांवर वाहने काढताना ट्रकमुळे रस्ता दिसत नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नियमबाह्य व नियमांचे उल्लंघन करून मुख्य मार्गावर अवैध पार्किंग करणाऱ्या ट्रक चालकाविरूद्ध कारवार्इंचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी होत आहे. विविध ट्रान्सपोर्ट कंपनीचे ट्रक या ठिकाणी नियमबाह्य उभे केले जातात. दिवसा व रात्री या ठिकाणी ट्रकचा नेहमीच ठिय्या असतो. ट्रान्सपोर्ट नगरमध्ये ट्रक ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्यानंतरही याठिकाणी रस्त्यावर ट्रकची अवैध पार्किंग करण्यात येत असल्यामुळे अनेक नागरिकांना अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर वाहन आणताना ट्रकांची मोठी रांग अडथळा ठरत आहे. मुख्य रस्त्यावरील वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच दुचाकी वाहनचालकांचे किरकोळ अपघात घडतात. परंतु या ठिकाणी कधीही वाहतूक पोलीस कारवाई करीत नाही. त्यामुळे ट्रकचालकांनी रस्त्याच्या कडेलाच शेकडो ट्रकांची नेहमीच अवैध पार्किंग केली जात आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी कारवाई संदर्भाचे शहर वाहतूक पोलिसांना व संबधित पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे.