आदिवासी महिलांनी रोखले अग्नितांडव

By Admin | Updated: March 13, 2016 23:59 IST2016-03-13T23:59:33+5:302016-03-13T23:59:33+5:30

जेवण आटोपून मुलासह शेजारच्या घरी टीव्ही पाहायला गेलेल्या महिलेच्या घराला अचानक आग लागली. ...

Tribal women stopped by Agniandav | आदिवासी महिलांनी रोखले अग्नितांडव

आदिवासी महिलांनी रोखले अग्नितांडव

हिरदामल येथील प्रकार : रणरागिणींनी धाडसाने विझविली आग
नरेंद्र जावरे चिखलदरा
जेवण आटोपून मुलासह शेजारच्या घरी टीव्ही पाहायला गेलेल्या महिलेच्या घराला अचानक आग लागली. उसळलेला आगडोंब संपूर्ण गावाला कह्यात घेतो की काय, असे वाटत असतानाच गावातील आदिवासी महिलांनी एकत्र येऊन मिळेल त्या साधनाने आगीवर पाणी ओतले आणि बघता-बघता आग आटोक्यात आली. रात्री २ वाजेपर्यंत रणरागिणींचे आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. चिखलदरा तालुक्यातील हिरदामल येथे शनिवारी मध्यरात्री दरम्यान घडलेल्या या घटनेची व आदिवासी महिलांच्या धाडसाची परिसरात चर्चा होती.
बदनापूर ग्रामपंचायतीअंतर्गत हिरदामल या ५८४ लोकसंख्येच्या गावात १२९ घरे आहेत. शनिवारी रात्री ११ वाजता मुन्नी नारायण चतुरकर नामक महिला जेवण आटोपल्यानंतर मुलाला घेऊन शेजारच्या घरी टीव्ही पाहायला गेली. काही वेळातच तिच्या घराला आग लागल्याचे गावकऱ्यांना दिसले. आदिवासींची कुडामातीची घरे एका रांगेत असल्याने एका घराला आग लागल्यास अख्ख्या गावाची राखरांगोळी झाल्याचा प्रकार मेळघाटात नेहमीच घडतो. त्यामुळे अग्नितांडव रोखण्याकरिता गावकऱ्यांनी गावागावात मदतीसाठी फोन केले.
अन् रणरागिनी आल्या धाऊन
मुन्नी चतुरकर ही दहा वर्षांच्या चेतन नामक मुलासोबत एकटीच राहाते. या निराधार महिलेचे पेटते घर विझविण्यासाठी सरपंच पुष्पा गाणू सावलकरसह जुनाय जामकर, लक्ष्मी धांडे, रिचमू बेलसरे, शांता सावलकर, फुलवंती जामकर, शांता काळे, यशोदा मावस्कर, रुपाय चतुर, फुलकाय धांडे, सरस्वती धांडे या महिलांनी पुढाकार घेतला.
घरातील गुंड, बादल्यांनी तसेच मिळेल त्या साधनांनी त्यांनी आगीवर पाणी ओतले.

महिलांनी हातात मिळेल त्या भांड्यात पाणी आणून गाव वाचविले. दिमतीला पुरुषदेखील होते. मात्र, मेळघाटचे आ. प्रभुदास भिलावेकर यांना फोन केल्यानंतरही त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही.
- पुष्पा गाणू सावलकर,
सरपंच, बदनापूर ग्रामपंचायत

माहिती मिळताच परतवाडा येथून अग्निशमन दलसोबत नेले. शासकीय नियमानुसार सानुग्रह अनुदान देण्यात आले.
- अभिजित देशमुख,
तलाठी, चिखलदरा

तलाठ्यांनी आणले अग्निशमन दल
शनिवारी रात्री वादळ वारे मोठ्या प्रमाणात असल्याने मुन्नी चतूर या महिलेच्या घराला लागलेली आग पसरण्याच्या बेतात होती. हवेत संपूर्ण गावच पेटते की काय, अशी स्थिती होती. सरपंच पुष्पा सावलकर यांनी तलाठी अभिजित देशमुख यांना दूरध्वनीवर माहिती दिली. देशमुख लगेच अग्निशमन दलासह हिरदामल येथे पोहोचले. मात्र, तोपर्यंत आग आटोक्यात आली होती. धामणगाव गढी येथील दीपक अग्रवाल यांचा खासगी टँकरसुध्दा घटनास्थळी पोहोचला होता. हिरदामलला रविवारी पोलीस व महसूल प्रशासनासोबत परतवाडा येथील महिला बचत गट, आदिवासी संघटनेचे महादेव कास्देकर, जि.प.सदस्या वनमाला खडके, नायब तहसीलदार नरेंद्र वनवे, प्रफुल्ल राव आदींनी भेट दिली.

 

Web Title: Tribal women stopped by Agniandav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.