Tribal people should have justice | आदिवासींच्या लोकनायकाला हवाय न्याय

आदिवासींच्या लोकनायकाला हवाय न्याय

लोकमत दिनविशेष

- मोहन राऊत

अमरावती: आपल्या २५ वर्षांच्या अल्प आयुष्यात आदिवासींमध्ये स्वदेशी व भारतीय संस्कृतीची प्रेरणा जागवून ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा उभारणारे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या नावाने राज्यात एकही योजना नाही. ‘आदिवासींच्या लोकनायकाला हवाय न्याय’ अशी मागणी त्यांच्या शुक्रवारी होणाऱ्या जयंतीनिमित्त राज्यातील आदिवासींनी केली आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांची जयंती संपूर्ण देशात आदिवासी बांधव साजरी करतात़. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील रांचीजवळील लिहतू या आदिवासी गावात झाला. ब्रिटिशांच्या राजवटीत आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारांवर बाधा येण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यांनी इंग्रजाविरुद्ध मोठा लढा उभारला होता. 

सन १८९४ मध्ये बिहार राज्यात भीषण दुष्काळ पडला. त्या दुष्काळात उपासमारी व महागाईने अनेक लोक मरण पावले. त्यावेळी त्यांनी गरीब आदिवासी समाजाची नि:स्वार्थ अंतकरणाने सेवा केली़  ब्रिटिश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करून दुष्काळावर मात करण्याकरिता त्यांनी जनआंदोलन केले होते़  त्यावेळी बिरसा मुंडा यांना दोन वर्षांचा कारावास झाला होता. 

सन १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने पारंपरिक तीर-कमठा, भाले यांच्या साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढविले होते़  सन १९०० मध्ये बिरसा मुंडा डोमवाडी पहाडावर आदिवासी जनतेला मार्गदर्शन करीत असताना ब्रिटिश सैन्याने हल्ला चढविला. तद्नंतर रांची कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तेथे अनन्वित छळ झाल्याने त्यांचे निधन झाले.

आदिवासी आमदार कधी घेणार पुढाकार?

देशातील झारखंड, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपले दैवत मानतो़  झारखंड राज्यात बिरसा मुंडा कन्यारत्न योजना सुरू आहे़  परंतु, महाराष्ट्रात एकही योजना या क्रांतिकारकाच्या नावाने सुरू करण्यात आली नाही. राज्यात आज २५ आदिवासी आमदार आहेत़  त्यांनी पुढाकार घेतला, तर बिरसा मुंडा यांच्या नावाने योजना सुरू करण्यास सरकारला अवधी लागणार नाही. आता आदिवासी आमदार कधी पुढाकार घेणार, असा सवाल आदिवासींच्या संघटनेने केला आहे. 

धामणगावातील दोन हजार कार्यकर्ते जाणार नागपूरला 

आदिवासी बिरसा मुंडा यांच्या शुक्रवारी होणाºया जयंतीनिमित्त नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी धामणगाव तालुक्यातील दोन हजार आदिवासी कार्यकर्ते नागपूरला जाणार  आहेत. 

इतर राज्यात बिरसा मुुंडा यांच्या नावाने अनेक योजना सुरू आहेत. परंतु, महाराष्ट्रात एकही योजना नाही. जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी, शासकीय कार्यक्रम, विविध योजना राबविल्यास तेच बिरसा मुंडा यांना खरे अभिवादन ठरणार आहे़
- प्रभुदास पंधरे, आदिवासी मानव संशोधन व सामाजिक संस्था, मुंबई

Web Title: Tribal people should have justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.