आदिवासी महामंडळाला व्यवस्थापकाचा चुना, लक्षावधींचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:21 IST2017-09-28T17:20:08+5:302017-09-28T17:21:01+5:30
मेळघाटातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आदिवासी विकास महामंडळामार्फत विविध उपयोजना राबविल्या जात असताना धारणी येथील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकाने लाखोंचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.

आदिवासी महामंडळाला व्यवस्थापकाचा चुना, लक्षावधींचा अपहार
अमरावती - मेळघाटातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आदिवासी विकास महामंडळामार्फत विविध उपयोजना राबविल्या जात असताना धारणी येथील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकाने लाखोंचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होऊ घातलेल्या आदिवासी विभागाच्या ४४ व्या वार्षिक आमसभेकडे लक्ष लागून राहिले आहे. या आमसभेत मेळघाटातील अपहाराचा मुद्दा गाजणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात आदिवासी उपयोजनेंतर्गत धान्य एकाधिकार योजना चालविण्यात येते. आदिवासी शेतकºयांची लूट होऊ नये व त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, हेच योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु धारणी येथे कार्यरत तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक एस.एस.सांभारे यांनी सर्व नियम पायदळी तुडवीत योजनेत अपहार करून शासनाला लाखोंचा चुना लावला. यासंदर्भात शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष शैलेंद्र मालवीय यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्यासह संबंधितांकडे तक्रार केली होती.
सांबारे यांनी दोन वर्षांच्या कार्यकाळात केलेले कारनामे उघड होताच त्यांचे नाशिक येथे स्थानांतरण करण्यात आले. महामंडळाच्या महाव्यवस्थापकांची (प्रशासन) मेहेरनजर असल्याने मेळघाटातील गोदामात सात हजार क्विंटल तूर दर येऊनसुद्धा विकण्यात आली नाही, तर चना कमी दराने विकून महामंडळाला १२ लक्ष रूपयांचा चुना लावण्यात आला. जिल्हाभरात फक्त पाच व्यापाºयांनी जाहीर लिलावात मालाची बोली केली. सेवानिवृत्त ग्रेडरकडून नाफेडमार्फत व्यापा-यांची तूर खरेदी करून शासनाची फसवणूक सांभारे यांनी केल्याचा आरोप करीत अशा अनेक अपहारांची तक्रार मालवीय यांनी केली आहे.
आमसभेत उचलणार मुद्दा
आदिवासी विकास महामंडळाची ४४ वी वार्षिक आमसभा शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणार आहे. त्यात मेळघाटातील या भ्रष्टाचाराचे मुद्दे, राज्यातील आदिवासी मंडळाचे संचालक, शिवसेनेचे आदिवासी आमदार प्रामुख्याने उचलणार असल्याचे तक्रारकर्ता शैलेंद्र मालवीय यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.