चिखलदरा गार्डनमधील झाडे पर्यटकांसमवेत बोलतात, सेल्फीही देतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:11 IST2021-01-04T04:11:28+5:302021-01-04T04:11:28+5:30

फोटो - पी/०२/अनिल कडू फोल्डर परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत चिखलदरा येथील वनविभागाच्या गार्डनमधील झाडे पर्यटकांसोबत बोलायला लागली ...

The trees in the Chikhaldara Garden talk to the tourists and even take selfies | चिखलदरा गार्डनमधील झाडे पर्यटकांसमवेत बोलतात, सेल्फीही देतात

चिखलदरा गार्डनमधील झाडे पर्यटकांसमवेत बोलतात, सेल्फीही देतात

फोटो - पी/०२/अनिल कडू फोल्डर

परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत चिखलदरा येथील वनविभागाच्या गार्डनमधील झाडे पर्यटकांसोबत बोलायला लागली आहेत. बोलताना ते झाड स्वत:विषयीची संपूर्ण माहिती पर्यटकाला देते आणि शेवटी सेल्फीही घेते.

चिखलदरा गार्डनमधील शंभर प्रजातींच्या वेगवेगळ्या झाडांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडून एक क्यूआर कोड दिला आहे. या क्यूआर कोडखाली त्या प्रत्येक झाडाला युनिक नंबर दिला आहे. दिल्या गेलेला तो क्यूआर कोड आणि युनिक नंबर त्या झाडावर लावण्यात आला असून, त्यास बोलणारे झाड (टॉकिंग ट्री) संबोधण्यात आले आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पासमवेत दर्यापूरचे वृक्ष तथा वनप्रेमी सारंग धोटे यांनी एक मोबाईल ॲप, व्याघ्र प्रकल्पाला बनवून दिला आहे. या ॲपमध्ये वेगवेगळ्या दोनशे प्रजातींच्या झाडांची माहिती नमूद आहे. चिखलदरा गार्डनमध्ये गेलेल्या पर्यटकाला त्या बोलणाऱ्या झाडासोबत बोलायचे असल्यास तो ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावा लागतो. या ॲपविषयीची माहिती गार्डनमध्ये उपलब्ध आहे.

ॲप डाऊनलोडनंतर झाडावरील क्यूआर कोड पर्यटकाने स्कॅन केल्यानंतर किंवा युनिक नंबर मोबाईलमध्ये टाकल्यानंतर ते झाड पर्यटकाला हॅलो करते. पर्यटकाला त्याचे नाव विचारते आणि पर्यटकाचे नाव घेत स्वत:विषयीची संपूर्ण माहिती ते झाड पर्यटकाला सांगायला सुरुवात करते. स्वत:विषयीची संपूर्ण माहिती देऊन झाल्यानंतर स्वत:सोबतच्या सेल्फीची विचारणा करीत ते झाड सेल्फीही देते. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूरच्या सारंग धोटे यांनी विकसित केलेला हा ॲप विनामूल्य उपलब्ध असून, त्याला नेटही अत्यल्प खर्ची पडते.

चिखलदऱ्यातील हे शासकीय उद्यान १९३६ मध्ये इंग्रज वनअधिकाऱ्यांनी विकसित केले आहे. तब्बल ८४ वर्षांनंतर येथील ही झाडे मोबाईल ॲपद्वारे पर्यटकांसमवेत बोलू लागली आहेत. मागील सात दिवसांपासून म्हणजेच डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून ती बोलत आहेत.

सेमाडोह निसर्ग निर्वचन संकूल, कोलकास आणि आकोट, नरनाळामधील शहानूर संकुल परिसरातील झाडांनाही क्यूआर कोड आणि युनिक नंबर दिला जाणार आहे. यानंतर येथील झाडेही त्या मोबाईल ॲपद्वारे पर्यटकांशी बोलणार आहेत. झाडांविषयी जनजागृती आणि शिक्षणाच्या अनुषंगाने हा ॲप महत्त्वपूर्ण ठरला आहे.

कोट

चिखलदरा गार्डनमधील झाडे पर्यटकांसोबत बोलत आहेत. याकरिता मोबाईल ॲप विकसित करण्यात आला आहे. त्या प्रत्येक झाडाला क्यूआर कोडसह युनिक नंबर देण्यात आला आहे. सेमाडोह, कोलकास, शहानूरचीही झाडे लवकरच बोलणार आहेत.

- विशाल बनसोड, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती.

Web Title: The trees in the Chikhaldara Garden talk to the tourists and even take selfies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.