लस घेण्यासाठी १०० किमी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:09 IST2021-06-30T04:09:17+5:302021-06-30T04:09:17+5:30
संतोष ठाकूर अचलपूर : परिसरातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील युवक कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी मध्यप्रदेशात धाव घेत आहेत. ...

लस घेण्यासाठी १०० किमी प्रवास
संतोष ठाकूर
अचलपूर : परिसरातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील युवक कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी मध्यप्रदेशात धाव घेत आहेत. अचलपूर व परतवाडा शहर तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील युवक १०० किमी प्रवास करून मध्य प्रदेशातील आरोग्य केंद्रांवर लस घेऊन येत आहेत.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण मोहीम अचलपूर शहर व ग्रामीण भागात कासवगतीने सुरू आहे. हजारो नागरिक पहिल्या डोससाठीच प्रतीक्षा यादीत आहेत. त्यात आता तिसरी लाट दारावर आली असल्याचे संकेत मिळत आहेत. दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. शेकडो मुलेमुली अनाथ झाल्या. सर्व वयोगटातील व्यक्तींना कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे सर्वांना लस हवी आहे.
अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील युवकांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली नसल्यामुळे युवक लसीसाठी इतरत्र फिरत आहे. त्यातच अचलपूर तालुक्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश येथील बैतूल जिल्ह्यातील भैसदेही, खोमई, धाबा, गुडगाव येथे जाऊन युवक कोरोना लस घेऊन येत आहेत.