Trap cameras were launched in the university premises | विद्यापीठ परिसरात लागले ट्रॅप कॅमेरे
विद्यापीठ परिसरात लागले ट्रॅप कॅमेरे

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दोन वर्षांपासून विद्यापीठात स्थिरावलेल्या बिबट्याने आता बाहेरील भागात धूम ठोकल्याने वनविभागाने त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल सहा ट्रॅप कॅमेरे शनिवारी लावले गेले. यात विद्यापीठ आणि एसटी महामंडळाच्या कार्यशाळा परिसरात प्रत्येकी तीन ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्यात बिबट कैद झाल्यानंतर वनविभाग पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
‘लोकमत’ने २ नोव्हेबर २०१९ रोजी ‘बिबट्याचा विद्यापीठाबाहेर संचार’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. बिबट आता बाहेर पडल्याने नागरी वस्त्यांमध्ये धोका निर्माण झाली आहे. त्यानंतर वनविभागाने शनिवारी विविध उपाययोजनेसाठी पुढाकार घेतला. वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलाश भुंबर यांच्या मार्गदर्शनात पहिल्या टप्प्यात वनपाल घागरे यांनी बिबट्याच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर सहा ट्रॅप कॅमेरे बसविले. पुढे तीन ते चार दिवस बिबट्याच्या हालचालींवर या माध्यमातून वन कर्मचारी लक्ष ठेवतील. २४ आॅक्टोबर रोजी बिबट विद्यापीठ परिसरात दिसून आल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. बिबट्याला विद्यापीठात शिकार मिळणे कठीण झाल्यामुळे तो बाहेरील मार्ग शोधत असल्याची माहिती विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे सहायक कुलसचिव रवींद्र सयाम यांनी दिली. बिबट्याच्या शिकारीमुळेच श्वानांची संख्या परिसरात कमी झाल्याची कबुली विद्यापीठाने दिली. आता बिबट्याने विद्यापीठाच्या दर्शनी भागाकडे कूच केल्याची बाब धोकादायक मानली जात आहे. वनविभागाने उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

विद्यापीठाने जंगलातून येणारे मार्ग पूर्णत: बंद करावे, यासाठी सहा महिन्यांपूर्वीच पत्र दिले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना विद्यापीठात ये-जा करता येणार नाही. विद्यापीठाची सीमा आणि जंगल लागूनच आहे. वनविभाग बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
- कै लास भुंबर, वनपरिक्षेत्राधिकारी, वडाळी

Web Title: Trap cameras were launched in the university premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.