राज्याच्या वन मंत्रालयात वनाधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘आनंदी आनंद’
By गणेश वासनिक | Updated: April 4, 2025 13:36 IST2025-04-04T13:35:18+5:302025-04-04T13:36:05+5:30
व्हाॅट्सॲप व्हॉइस कॉलद्वारे मेसेज : बदलीपात्र आरएफओंना आमदारांच्या शिफारस पत्राची मागणी

Transfers of forest officers in the state's forest ministry
गणेश वासनिक / अमरावती
अमरावती : मंत्रालयातील वनविभागाचे बदली व पदस्थापनेशी संबंधित आस्थापनेवर एका बड्या अधिकाऱ्यांनी तर त्यांची झालेली बदली विशेष प्रयत्न करून थांबवली आहे. त्यामुळे वनविभागात आजच्या घडीला सर्वत्र ‘आनंदी आनंद’ असल्याचे चित्र आहे, तर ‘भगवान’कडे सर्व कारभार ‘भगवान भरोसे’ सुरू आहे. प्रत्येक कामासाठी ‘लक्ष्मीदर्शन’ गरजेचे असल्याने बदलीपात्र वनाधिकाऱ्यांची गळचेपी होत असल्याची ओरड आहे.
मागील वर्षी २७० अधिकाऱ्यांची वनपरिक्षेत्र अधिकारी ते सहायक वनसंरक्षक या पदावर पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली होती. यामध्ये तत्कालीन मंत्र्यांचे खासगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी, मंत्रालयातील संबंधित अवर सचिव व उपसचिवांनी प्रचंड ‘श्रम’ घेतले. क्षेत्रीयस्तरावरील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून वनाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे हे सोपस्कार सुकरपणे आटोपले. मात्र आता वनपरिक्षेत्र अधिकारी संवर्गातील बदली व पदस्थापनेतही मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार निश्चित झाल्याने याबाबत मंत्रालय पातळीवर कार्यवाही सुरू झाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. प्रादेशिक व वन्यजीव शाखेतील कार्यकारी पदासाठी आरएफओंमध्ये स्पर्धा असल्याचे चित्र वनविभागात दिसून येत आहे
व्हॉट्सॲप व्हॉइस कॉल अन् डीएफओंच्या मंत्रालयीन वाऱ्या
वनविभागात सध्याही विभागीय वनाधिकारी संवर्गात अजून पदे रिक्त नसतानाही मंत्रालयातील बडे अधिकारी विचार क्षेत्रातील अधिकाऱ्यांना व्हाॅट्सॲप व्हॉइस कॉल करून भेटीच्या आमंत्रण देत आहेत. त्यामुळे बऱ्याच अधिकाऱ्यांच्या मुंबई वाऱ्या सुरू झालेल्या आहेत. क्षेत्रीय पातळीवरील परिस्थितीचा कुठलाही गंध नसलेले हे मंत्रालयातील अधिकारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा छळ करण्यात मात्र पटाईत आहेत.
"पुढील काळात काही विभागीय वनाधिकारी पदोन्नतीचा यादीत आहेत. त्यामुळेच अशा डीएफओंची माहिती गोळा केली जात आहे. पदे रिक्त झाल्यानंतरच डीएफओंना पदोन्नती दिली जाईल. अन्यथा चारच डीएफओंना पदोन्नती दिली जाणार आहे. आरएफओंच्या बदली, पदोन्नतीचे प्रस्ताव यायचे आहेत."
-आनंदा शेंडगे, अपर सचिव, वन मंत्रालय