वाहतूक पोलिसांनी वाहनचालकाला डांबले

By Admin | Updated: December 20, 2015 00:05 IST2015-12-20T00:05:23+5:302015-12-20T00:05:23+5:30

माझी दुचाकी नो-पार्किंगमध्ये नव्हतीच. तुम्ही ती का उचलली,

The traffic police stopped the driver | वाहतूक पोलिसांनी वाहनचालकाला डांबले

वाहतूक पोलिसांनी वाहनचालकाला डांबले

वाहतूक शाखेतील धक्कादायक प्रकार : मोबाईल हिसकावला, गाडगेनगर पोलिसांनाही पाचारण
अमरावती : माझी दुचाकी नो-पार्किंगमध्ये नव्हतीच. तुम्ही ती का उचलली, असा प्रश्न विचारणाऱ्या एका जबाबदार वाहनचालकाला वाहतूक पोलिसांनी पाऊ ण तास चक्क डांबून ठेवले.
पारदर्शक कारभाराची हमी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना दिलेली असताना हुकूमशाहीत शोभावा, असा हा प्रकार येथील इर्विन चौकातील वाहतूक शाखा कार्यालयात शनिवारी घडला.
मणिपूर कॉलनीतील रहिवासी अमोल काकडे (३५) हे राजापेठ चौकात काही कामानिमित्त आले होते. दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास त्यांनी राजापेठ चौकातील गुलशन मार्केटसमोर पार्किंगमध्ये दुचाकी (एम.एच. डब्ल्यू ७६८०) उभी केली. काही वेळानंतर दुचाकी तेथे नव्हती. वाहतूक पोलिसांनी येथील दुचाकी उचलून नेल्याचे कळल्यावर अमोल यांनी इर्विन चौकातील वाहतूक शाखेचे कार्यालय गाठले. दुचाकी नो-पार्किंगमध्ये नसतानाही पोलिसांनी गाडी आणली कशी, असा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला. माझी चूक नाही. माझी गाडी त्वरित परत द्या, असा आग्रह अमोलने धरला. पोलीस अमोलच्या प्रश्नाने बिथरले होतेच. दंड भरल्याशिवाय गाडी परत मिळणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. अमोल प्रश्नावर प्रश्न उपस्थित करीत असल्याचे बघून उपस्थित पोलिसांनी त्यांना घेराव घातला. अमोल यांना आरोपीप्रमाणे ओढत-ओढत कार्यालयातील एका खोलीत लोटले गेले. बाहेरून दार लावण्यात आले. अमोल यांना सुमारे पाऊ ण तास डांबून ठेवण्यात आले. वाहने उचलणाऱ्या व्यक्तीने अमोलजवळील मोबाईल हिसकावला व फेकल्याचा आरोप अमोलचा आहे.
हा तमाम प्रकार वाहतूक पोलीस निरीक्षक नीलिमा आरज यांच्यासमोर घडला. अमोलला ताब्यात देण्यासाठी गाडगेनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. तुरुंगातच जायची वेळ आल्याने अमोलने दंड भरून दुचाकी सोडवून घेतली. गाडगेनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

हीच का लोकाभिमुख पोलिसिंग?
अमरावती : वाहतूक शाखेत कुणी वाहनचालक आक्षेप वा तक्रार घेऊन आल्यास त्यांची तक्रार नोंदवून घ्यायला हवी. तो प्रत्येक नागरिकाचा अधिकारच आहे. पोलीस झुंडशाहीप्रमाणे कुण्या सामान्य माणसावरच तुटून पडत असतील, अपमानित करीत असतील, डांबून ठेवत असतील तर ही पोलिसिंग लोकाभिमुख म्हणायची काय?
तर कारवाई काय केली?
संबंधित वाहनचालकाने हुज्जत घातली असेल, तर पोलिसांनी काय कारवाई केली. त्या इसमाने सरकारी कामात अडथडा केला असल्यास भादंविचे कलम ३५३ आणि १८६ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. तथापि १३० रुपयांचा दंड वसूल करून जर वाहतूक पोलिसानी सोडले तर, तो दोषी कसा असा प्रश्न सुप्रसीध्द विधी तज्ज्ञ अनिल विश्वकर्मा यांनी उपस्थित केला. प्रश्न उपस्थित करण्याचा आणि माहिती मिळविण्याचा भारतीय नागरिकांना संवैधानिक अधिकार आहे. एक तर तो गुन्हेगार असेल तरच ताब्यात घेणे शक्य आहे. जर तो गुन्हेगाराच नाही, तर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या नैतीक अधिकाराचे हनन करण्याचा अधिकार पोलिसांना नाही.

गोंधळ घालणाऱ्या त्या युवकाची दुचाकी नो-पार्किंगमधून उचलली. तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने कर्मचाऱ्यांशीही वाद घातला. त्यामुळे कठोर भूमिका घ्यावी लागली.
- नीलिमा आरज,
पोलीस निरीक्षक तथा प्रभारी एसीपी, वाहतूक शाखा.

माझी दुचाकी सिंगल लाईन पार्किंगमध्येच होती. मात्र, तरीही ती पोलिसांनी उचलून नेली. हा अन्यायच आहे. मी जाब विचारला असता मला पोलिसांनी आरोपीसारखी वागणूक दिली. तब्बल तासभर वाहतूक शाखा कार्यालयातील एका खोलीत डांबून ठेवले.
- अमोल काकडे,
दुचाकी चालक.

आयुक्तांच्या कार्यप्रणालीवर गालबोट
पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर हे संवेदनशील पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या योजना आणि उद्देश लोकाभिमुख पोलिसिंगचेच आहेत. तथापि त्यांच्या अधिनस्थ कार्यरत अधिकारी कर्मचारी आयुक्तांच्या उपरोक्ष अधिकारांचा असा गैरवापर करीत असल्याने बोटे उठतात ती आयुक्तांच्याच कार्यप्रणालीवर !

Web Title: The traffic police stopped the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.