केळीतही विष!
By Admin | Updated: April 29, 2016 00:11 IST2016-04-29T00:11:40+5:302016-04-29T00:11:40+5:30
केळीला आयुर्वेदात पूर्णान्न म्हटले जाते. लहान मुलांनी दिवसभरातून खाल्लेले एक केळ संपूर्ण आहाराच्या समतुल्य असते, ...

केळीतही विष!
आजारांचा प्रसार : इथेलीन, कॅल्शियम कार्र्र्बाईडचा वापर
संदीप मानकर अमरावती
केळीला आयुर्वेदात पूर्णान्न म्हटले जाते. लहान मुलांनी दिवसभरातून खाल्लेले एक केळ संपूर्ण आहाराच्या समतुल्य असते, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. मात्र, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेली केळी देखील विषयुक्त आहेत.
‘मृत्यूची विक्री’ या मथळ्याखाली लोकमतने गुरूवारच्या अंकात कॅल्शियम कार्बाईड या घातक रसायनाचा आंबे पिकविण्यासाठी कसा सर्रास वापर होतोय, हे सचित्र, सप्रमाण स्पष्ट केले होते. आंबा हे फळ फक्त उन्हाळ्यात बाजारात उपलब्ध असते. मात्र, वर्षभर बाजारपेठेत दिसणारी केळी देखील विषयुक्त रसायनांचा वापर करून पिकविली जात असतील व त्यांची सर्रास विक्री होत असतील तर त्यातून पसरणाऱ्या आजारांचा वेग किती असेल, याची कल्पना केली जाऊ शकते. अमरावती शहरात केळीचे सुमारे सहा मोठे गोेदाम आहेत. त्यापैकी पठाण चौकात तीन, इतवारा बाजारात एक आणि बसस्थानकाजवळ एक गोदाम आहे. या गोदामात बाहेरील तालुक्यातून आणि इतर जिल्ह्यांमधून आलेली कच्ची केळी एकत्र केली जातात. यापैकी काही ठिकाणांहून पिकलेली केळी देखील येतात. या गोेदामात कच्ची केळी पिकविण्यासाठीची प्रक्रिया केली जाते. येथील काही गोेदामात केळी तत्काळ पिकविण्यासाठी इथेलिनच्या फवारणीसाठी यंत्रे बसविण्यात आली आहेत.
अंबानगरी येथून येतात केळी
अंबानगरीत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पथ्रोेट, पांढरी आणि अंजनगाव तसेच जळगाव खानदेश येथून केळीची मोठ्या प्रमाणात आवक होते. येथून सकाळी पिकविलेली व कच्ची केळी पठाण चौक, इतवारा, बसस्थानकानजीकच्या गोदामात दाखल होतात. चार ते पाच ट्रक केळी दररोज शहरात येतात. पहाटे पाच वाजता केळीचा लिलाव होतो व त्यांचे किरकोळ विक्रेत्यांकडे वितरण केले जाते.
अशी पिकविली जातात केळी
केळीच्या फणीवर इथेलिनची फवारणी केली जाते. त्यानंतर दोन दिवस ही केळी गवतात किंवा बंद खोलीत झाकून ठेवली जातात. त्यामुळे रात्रभरात ही केळी पिवळी होतात. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक इथेलिन घातक ठरत असूनही मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते.
कॅल्शियम कार्बाईडमधून केळींना उष्णता प्रदान केली जाते. विशिष्ट तापमान ‘मेंटेन’ करण्याकरिता एसीचा वापर केला जातो. यामुळे कृत्रिमरित्या पिकविलेली केळी बराच काळ ताजी व टवटवीत राहतात.
इथेपोलिन-३९-एसएल (टॅगपोटिल-३९) या दोन झाकणे रसायनाच्या वापराने पाच डझन केळी पिकविली जाऊ शकतात. बादलीभर पाण्यात दोन झाकण द्रव्य टाकले जाते. या द्रावणात पाच डझन केळीचा घड बुडवून काढला जातो.दोन दिवसांत ही केळी पिकतात.