प्लॅटफाॅर्म तिकीटसाठी आजपासून मोजावे लागतील ५० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 05:00 IST2021-03-11T05:00:00+5:302021-03-11T05:00:56+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना रेल्वे गाड्या निरतंरपणे सुरूच आहेत. बाहेरगावाहून नातेवाईक, आप्तस्वकीयांचे आवागमन सुरूच आहे. गर्दीला आवर घालण्याचे निर्देश राज्य व केंद्र शासनाचे आहेत. त्यामुळे रेल्वे बोर्डाने महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्याचा निर्णय घेतला. प्लॅटफाॅर्म तिकीट महाग झाल्यास यापुढे प्रवाशांना सोडण्यासाठी व घेण्यासाठी गर्दी होणार नाही, असा अंदाज रेल्वे विभागाने वर्तविला आहे.

प्लॅटफाॅर्म तिकीटसाठी आजपासून मोजावे लागतील ५० रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सोडण्यासाठी नातेवाईक, आप्तस्वकीयांची होणारी गर्दी रोखण्यासाठी आता प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले. रेल्वे बोर्डाच्या या नव्या आदेशाची अंमलबजवाणी ११ मार्चपासून होत आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागाच्या प्रबंधकांचे ५ मार्च रोजी पत्र धडकले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना रेल्वे गाड्या निरतंरपणे सुरूच आहेत. बाहेरगावाहून नातेवाईक, आप्तस्वकीयांचे आवागमन सुरूच आहे. गर्दीला आवर घालण्याचे निर्देश राज्य व केंद्र शासनाचे आहेत. त्यामुळे रेल्वे बोर्डाने महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्याचा निर्णय घेतला. प्लॅटफाॅर्म तिकीट महाग झाल्यास यापुढे प्रवाशांना सोडण्यासाठी व घेण्यासाठी गर्दी होणार नाही, असा अंदाज रेल्वे विभागाने वर्तविला आहे. अगोदर प्लॅटफाॅर्म तिकीटसाठी १० रुपये मोजावे लागत होते, आता गुरुवारपासून ५० रुपये मोजावे लागतील. प्लॅटफाॅर्मशिवाय फलाटावर प्रवेश केल्यास रेल्वे नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आरपीएफने स्पष्ट केले आहे. प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये केल्याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याऐवजी प्रवेशद्वारावर नियमांचे पालन करण्यासाठी सक्ती असावी, असा सूर उमटत आहे. ५० रुपये प्लॅटफाॅर्म तिकीट करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची भावना सामान्यांची आहे. कोरोना काळात प्लॅटफाॅर्म तिकीट महागडे करुन काय साध्य करणार असा सवाल उपस्थित होत आहे.
या रेल्वे स्थानकांवर लागेल प्लॅटफाॅर्म तिकीट
बडनेरा, अमरावती, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, खंडवा.
प्लॅटफाॅर्म तिकीट दरवाढीचा निर्णय अन्यायकारक आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांना पत्र दिले जाईल आणि प्लॅटफाॅर्म तिकीट पूर्वीप्रमाणेच १० रुपये करावे, अशी मागणी केली जाईल.
- नवनीत राणा, खासदार
प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करणे हा सामान्य प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रकार आहे. याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे निवेदन पाठवून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा करेल.
- अनिल तरडेजा, यात्री महासंघ