आज लक्ष्मी, कुबेर अन् नव्या केरसुनीची पूजा
By Admin | Updated: October 22, 2014 23:10 IST2014-10-22T23:10:58+5:302014-10-22T23:10:58+5:30
श्रीरामाने रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुद्धाच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रज्ज्वलित केलेले लाखो दिवे अशा विविध पुरातन इतिहासाची

आज लक्ष्मी, कुबेर अन् नव्या केरसुनीची पूजा
मोहन राऊत - अमरावती
श्रीरामाने रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुद्धाच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रज्ज्वलित केलेले लाखो दिवे अशा विविध पुरातन इतिहासाची साक्ष असलेल्या दिवाळी सणाच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर व नव्या केरसुणीची पूजा करण्याची परंपरा आजही कायम आहे़
दिवाळी हा सण आश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीया या सहा दिवसांच्या कालावधीत साजरा करण्यात येतो़ बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता़ त्या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामनरूप धारण करून बळीराजाला तीन पायांत दान मागितले़ विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले़ बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पातळाचे राज्य देऊन भू-लोकवासी त्याच्या आठवणी निमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील, असे आश्वासन दिले होते़ दिवाळीच्या एकदिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता़ यामुळे आनंद झालेल्या गोकूळवासीयांनी दुसऱ्या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता़ इ़स़२५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती़ जैन धर्माचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशी बिहारमधील पावापुरी येथे शरीरत्याग केला होता़ महावीर सवंत त्यांच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते़ त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरूवात मानतात़ प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे़ लक्ष्मी आश्वीन अमावस्येच्या रात्री सर्वच घरी संचार करून आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान या दिवशी शोधू लागते जिथे स्वच्छता, शोभा, व रसिकता आढळते तिथे ती आकर्षित होते़ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष व क्षमाशील पुरूष व स्त्रिया वास्तव्य करतात त्या घरी लक्ष्मीला जाणे आवडते, अशी आख्यायीका आहेत़