सततच्या जाचाला कंटाळून बायकोने आवळला नवऱ्याचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 21:48 IST2022-04-05T21:48:28+5:302022-04-05T21:48:53+5:30
Amravati News ¯ पतीला बेदम मारहाण करून व विजेच्या खांबाला बांधून त्याचा दोरीने गळा आवळण्यात आला. ही खळबळजनक घटना मोझरी येथील संतोषी मातानगर येथे मंगळवारी दुपारी १.३० ते २.३० च्या दरम्यान घडली.

सततच्या जाचाला कंटाळून बायकोने आवळला नवऱ्याचा गळा
अमरावती: पतीला बेदम मारहाण करून व विजेच्या खांबाला बांधून त्याचा दोरीने गळा आवळण्यात आला. ही खळबळजनक घटना मोझरी येथील संतोषी मातानगर येथे मंगळवारी दुपारी १.३० ते २.३० च्या दरम्यान घडली. सुनील वंजारी (४६, रा. पांढरी. ता. अंजनगाव सुर्जी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताची पत्नी माधुरी सुनील वंजारी (३८) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तिला अटक करण्यात आली असून, तिने खुनाची कबुली दिली आहे.
तक्रारीनुसार, मोझरी येथील महादेवराव साठवणे यांच्या मुलीचा विवाह अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी येथील सुनील वंजारी यांच्याशी १२ वर्षांपूर्वी झाला होता. परंतु, सुरुवातीपासूनच पती-पत्नीमध्ये खटके उडायचे. त्यामुळे चार महिन्यापासून माधुरी आपल्या दोन मुलांसह मोझरी येथे आईकडे राहत होती. एमआयडीसीमधील कंपनीत कामाला जात होती. परंतु, तिचा पाठलाग करीत तो काही दिवसापासून मोझरीतच राहत होता. महामार्गावरील एका ढाब्यावर काम करीत होता.
मंगळवारी दुपारी सुनील वंजारी हा मोझरी येथे सासरी पोहोचला. बराच वेळ पती-पत्नीमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. थोड्याच वेळात दोघेही एकमेकांवर तुटून पडले. सुनीलने मद्यपान केले असल्याने तो लवकरच खाली कोसळला. त्यानंतर पत्नीने त्याचे हातपाय दोराने बांधून त्याला विजेच्या खांबाला बांधून ठेवले तथा दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली, अशी कबुली खुद्द पत्नीने दिली. घटनास्थळावर तिवसा पोलिसांनी पंचनामा केला. आरोपी माधुरी वंजारी हिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पांडे करीत आहेत.
मुलांचे छत्र हरवले
पती-पत्नीचा वाद विकोपाला जाऊन अखेर पतीच्या हत्येवर थांबला. बापाला यमसदनी पाठवून माय कायमची गजाआड झाली. परंतु, दोन्ही चिमुकल्या मुलांचा विचार मायबापांनी केला नाही. अवघे सहा-सात वर्ष वय असलेले दोन्ही भावंडे पोरकी झाली आहेत. म्हाताऱ्या आजीच्या पदरात ती तोंड लपवून हमसून रडत असताना उपस्थितांचे मन हेलावून गेले होते.