कराचे १७.९६ कोटी थकीत
By Admin | Updated: March 1, 2015 00:23 IST2015-03-01T00:23:09+5:302015-03-01T00:23:09+5:30
मार्च महिन्यात महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाची आतापासून ‘मार्च एडिंग’ची लगबग सुरु झाल्याचे दिसून येते.

कराचे १७.९६ कोटी थकीत
अमरावती : मार्च महिन्यात महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाची आतापासून ‘मार्च एडिंग’ची लगबग सुरु झाल्याचे दिसून येते. अशातच एलबीटी बंद होणार असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी मालमत्ता कर वाढीवर सर्वाधिक भर दिला जात आहे. परिणामी मालमत्ता कराच्या थकीत १७.९६ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. विशेष कर वसुलीच्या माध्यमातून ‘कर्मचारी नागरिकांच्या दारी’ हे अभियान राबविले जात आहे.
महापालिका अर्थसंकल्पात मालमत्ता कराचे उत्पन्न ३८ कोटी ९६ लाख ७९ हजार २१० रुपये अपेक्षित होते. त्यानुसार पाचही झोनचे सहायक आयुक्तांनी २०१४- २०१५ या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कृती आराखडा तयार करुन थकित रक्कम कमी आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु मालमत्ता कराची थकित रक्कम जास्त प्रमाणात वसूल व्हावी, यासाठी आयुक्तांनी कर वसुली लिपीक, अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचे ठरविले आहे. आगामी काळात कोणत्या झोनमध्ये मालमत्ता कराची रक्कम सर्वाधिक वसूल केली जाते, हे एप्रिल महिन्यात स्पष्ट होईल. १ एप्रिल २०१४ ते ११ फेब्रुवारी २०१५ या दरम्यान २१ कोटी ५९ लाख ६६९ रुपये वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. थकित मालमत्ता कराची रक्कम वेळेपुर्वी भरल्यास व्याजाच्या रक्कमेतून सूट देण्याची सवलत देखील प्रशासनाने दिली होती.
या उपक्रमाचा अनेक मालमत्ता धारकांनी लाभ घेत वेळेतच कराचा भरणा करुन प्रशासनाला सहकार्य केले आहे. मात्र थकित १७.९६ कोटी रुपयांच्या कराची रक्कम वसूल करण्यासाठी उणेपुरे महिना शिल्लक असून ती वसूल करण्यासाठी कर वसुली लिपीक, सहायक आयुक्तांना रात्रीचे दिवस करावे लागणार आहे. हल्ली प्रभाग क्रमांक १ उत्तर झोन रामपुरी कॅम्प, प्रभाग क्रमांक २ मध्य झोन राजकमल चौक, प्रभाग क्रमांक ४ दक्षिण झोन बडनेरा या कार्यालयातील कर वसुली आघाडीवर असल्याचे आकडेवारीने दिसून येते. अर्थसंकल्पात मालमत्ता कराचे उत्पन्न वाढीवर भर दिला जाणार असून प्रशासनाने तशी तयारी चालविली आहे. येत्या अर्थसंकल्पात मालमत्ता कराचे ५० कोटी रुपयांचे उत्पन्न गृहित धरुनच सादर होण्याचे संकेत आहे.