महाकालच्या भक्तांवर काळाची झडप; एकाचा मृत्यू, १० गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST2021-08-26T05:00:00+5:302021-08-26T05:00:58+5:30

सुर्जी येथील युवक एमएच १३ सीएस ८५७० क्रमांकाच्या वाहनाने रविवारी सायंकाळी ओंकारेश्वर, उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून मंगळवारी रात्री ते परत निघाले. सकाळी ६ च्या सुमारास पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरीनजीक पुलाच्या कठड्याला वाहनाची धडक पुलाला लागली.

Time is running out on the devotees of Mahakala; One death, 10 serious | महाकालच्या भक्तांवर काळाची झडप; एकाचा मृत्यू, १० गंभीर

महाकालच्या भक्तांवर काळाची झडप; एकाचा मृत्यू, १० गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी/पथ्रोट  : उज्जैन येथून महांकालाच्या दर्शनाहून परतणाऱ्या युवकांच्या वाहनाला पांढरीनजीक अपघातप्रवण स्थळी अपघात होऊन राजू कतोरे या युवकाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास अंजनगाव सुर्जीचे अंतर अवघ्या पाच मिनिटांचे राहिले असताना ही घटना घडली. 
सुर्जी येथील युवक एमएच १३ सीएस ८५७० क्रमांकाच्या वाहनाने रविवारी सायंकाळी ओंकारेश्वर, उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून मंगळवारी रात्री ते परत निघाले. सकाळी ६ च्या सुमारास पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरीनजीक पुलाच्या कठड्याला वाहनाची धडक पुलाला लागली. वाहनचालक-मालक रणजित आवारे ((रा. देवगाव) याला अचानक डुलकी लागल्याने या घटनेत त्याच्यासह राजू कतोरे, अभिजित भावे, अनूप रेखाते, हर्षल अकोटकर, मयूर दातीर, अमोल पायघन, सागर धर्मे, अश्विन अस्वार, उमेश माकोडे, मंगेश नाथे (सर्व रा. अंजनगाव सुर्जी) हे २५ ते ३० वयोगटातील युवक गंभीर जखमी झाले. अचलपूर येथे उपचारादरम्यान राजू कातोरेचा मृत्यू झाला. त्याच्या शवविच्छेदनानंतर दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
उपस्थित लोकांनी सर्व जखमींना त्वरित अचलपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सागर धर्मे, अमोल पायघन, मंगेश नाथे, अश्विन अस्वार यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. रणजित आवारे, अभिजित भावे, हर्षल अकोटकर, मयूर दातीर, उमेश माकोडे, अनूप रेखाते या अतिगंभीर रुग्णांवर अमरावती येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विश्वसनीय सूत्रांनुसार, उमेश माकोडे याची प्रकृती गंभीर असून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. पथ्रोट पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 

अपघाताची मालिका 
पांढरीनजीक अपघातप्रवण स्थळी अपघाताची मालिका लागली आहे. काही वर्षांपूर्वी राजहंस ट्रॅव्हल्सचा येथे अपघात झाला होता. यानंतर महामंडळाची बस दिवसाढवळ्या धडकली होती. गतवर्षी गुलजारपुरा येथील यावले कुटुंबातील सदस्यांचा अपघात झाला होता.

सर्व जण शिवसैनिक 
चालक वगळता मृत व जखमी एका समाजाचे व शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. गंभीर जखमी अभिजित भावे युवा सेना शहरप्रमुख आहेत.

 

Web Title: Time is running out on the devotees of Mahakala; One death, 10 serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात